Dombivli Fraud Case | डोंबिवलीत बनावट कागदपत्रांद्वारे १५ लाखांची फसवणूक : शिंदे सेनेच्या उपतालुका प्रमुखासह चौघांना अटक

सांगावमधील यशवंत पार्क इमारतीच्या व्यवहारात रिक्षाचालकाची फसवणूक
 fraud case
fraud casefile photo
Published on
Updated on

Dombivli Shinde Sena Leader Arrested

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडे मानपाडा रोडला असलेल्या सांगाव येथील एका बेकायदा इमारतीतील सदनिका विक्रीच्या व्यवहारात बनावट कागदपत्रे वापरून रिक्षाचालकाची १५ लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिंदे शिवसेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख आणि महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या अध्यक्षासह चौघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे डोंबिवलीतील राजकीय आणि बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.

या प्रकरणी फिर्यादी बळीराम पांडुरंग जाधव हे व्यवसायाने रिक्षाचालक असून त्यांनी या संदर्भात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रामचंद्र गणपत माने, रामदास टेकाळे, लक्ष्मण मिसाळ आणि मोहनलाल चौधरी यांच्याविरूद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 fraud case
Dombivli LPG Cylinder Shortage: डोंबिवलीत गॅस सिलिंडरचा तुटवडा; ग्रामीण भागात १५ दिवसांनीही सिलिंडर मिळेना

फिर्यादी बळीराम जाधव यांच्या म्हणण्यानुसार, वर्ष २०१४ मध्ये सांगाव-नांदिवली येथील नंदा निवास चाळीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव रहिवाशांसमोर ठेवण्यात आला होता. त्यावेळी संबंधित इमारतीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची अधिकृत परवानगी असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रत्येक रहिवाशाला ३५० चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र नंतर ३०० चौरस फुटांचे घर देणार असल्याचे आणि अधिक क्षेत्रफळासाठी स्वतंत्र रक्कम भरावी लागेल असे सांगण्यात आले. वाढीव २६५ चौरस फुटांच्या बांधकामासाठी फिर्यादी बळीराम जाधव यांनी कर्ज काढून १५ लाख रूपये संबंधित विकासकांना दिले. मात्र नंतर यशवंत पार्क ही इमारत अनधिकृत असल्याचे समजल्याने त्यांनी बांधकाम परवानगीची पडताळणी केली. त्यावेळी दाखविण्यात आलेली ऑगस्ट २००८ मधील जिल्हा परिषदेची बांधकाम परवानगी बनावट असल्याचे उघड झाले.

 fraud case
Dombivli Gold Theft | डोंबिवलीत ज्वेलर्सच्या दुकानातील १६ लाखांच्या सोन्याच्या कॉईनसह बिहारी नोकरानी पसार

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील बांधकामासाठी जिल्हा परिषदेची बनावट परवानगी, खोटे शिक्के आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कथित बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून इमारत अधिकृत असल्याचा भास निर्माण करण्यात आला. त्यामुळे आपली आणि शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप फिर्यादी बळीराम जाधव यांनी केला आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रामचंद्र माने याने यापूर्वी ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. अलीकडेच त्याच्यावर कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तर आरोपी लक्ष्मण मिसाळ हा बांधकाम कामगार क्षेत्रातील महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचा अध्यक्ष आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हे चौघेही फरार होते. अखेर मानपाडा पोलिसांनी शोध घेऊन या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या चौकडीने यापूर्वी अशा पद्धतीने आणखी कुणाकुणाला फसविले आहे याचा चौकस तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news