Mumbai extortion case : वांद्र्यात पुनर्विकास सुरू ठेवण्यासाठी मागितली ११ कोटींची खंडणी; २५ लाख घेताना ५ अटकेत

वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक १८५१ नुसार २ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

मुंबई : वांद्रे पश्चिमेतील पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्यासाठी विकासकाकडून तब्बल ११ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मागणीतील २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्यासाठी आलेल्या पाच जणांना मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. डॅनियल स्टिव्हन, एथेल स्टिव्हन, नझीर शेख, अब्दुल्ला खान आणि रेमी फर्नांडिस अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक १८५१ नुसार २ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनर्विकासाचे काम सुरू ठेवायचे असल्यास पैसे द्यावे लागतील, अन्यथा प्रकल्पाच्या कामात अडथळे निर्माण करण्याची आणि धमकावण्याची भाषा करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत आहे.

Crime News
Thane Crime : भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

एफआयआरनुसार, तक्रारदार गगन शर्मा हे एका बांधकाम कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट विभागात कार्यरत आहेत. कंपनीकडून वांद्रे पश्चिमेतील परेरा रोड परिसरातील जुन्या मालमत्तेचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी जून २०२६मध्ये विकास करार करण्यात आला होता. संबंधित मालमत्तेवर डॅनियल स्टिव्हन, एथेल स्टिव्हन आणि त्यांचा चुलत भाऊ टोनी यांचा ताबा होता. मात्र, त्यांच्या मालकी हक्काबाबत न्यायालयीन आदेश असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पुनर्विकासाची माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीला ७ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास काम बंद पाडण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराच्या कार्यालयात येऊन तब्बल ३० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. पुढील चर्चेनंतर ही मागणी १८ कोटी रुपयांपर्यंत आली आणि अखेर ११ कोटी रुपयांवर रक्कम निश्चित झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.

दरम्यान, प्रकल्पाच्या साइटवर काही व्यक्ती येऊन सुरक्षा रक्षकांना धमकावत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. एका व्यक्तीने कमरेला बंदूक असल्याचे दाखवून दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तींचा ‘छोटा राजन’च्या नावाशी संबंध असल्याचे समजल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. मात्र, आरोपींचा छोटा राजन टोळीशी प्रत्यक्ष संबंध आहे की केवळ त्याच्या नावाचा वापर करून धमकी देण्यात आली, याचा तपास सुरू आहे.

Crime News
Mumbai footpath encroachment : मालाडमध्ये फुटपाथ मोकळा करण्यासाठी जागोजागी बॅनर

२५ लाखांचा सापळा

खंडणीच्या ११ कोटी रुपयांपैकी २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचला. पोलिसांनी २५ लाख रुपये असल्याचा भास निर्माण करण्यासाठी बनावट नोटांची बंडले तयार केली. बंडलांच्या वर आणि खाली खऱ्या ५०० रुपयांच्या नोटा ठेवण्यात आल्या.

ठरल्याप्रमाणे आरोपी पैसे घेण्यासाठी आले. रक्कम स्वीकारताच पोलिसांनी कारवाई करून पाचही जणांना अटक केली. त्यांच्या मोबाईल फोन, आर्थिक व्यवहार आणि संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासली जात आहे.

या खंडणीच्या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, ११ कोटींच्या मागणीचे सूत्रधार कोण आहेत, तसेच आरोपींचे अन्य गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहेत का, याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. या प्रकरणामुळे मुंबईतील मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांवर खंडणीखोरांची नजर असल्याचे पुन्हा समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news