

Dombivli Doctor Assault Case
डोंबिवली : डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयातीन डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेली मारहाणीची घटना अत्यंत निंदनीय आहे. घडलेल्या हिंसाचाराच्या या पार्श्वभूमीवर कायदा हातात घेणाऱ्या कुणालाही भाजपा-महायुती सरकार पाठीशी घालणार नाही, असा स्पष्ट इशारा डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शास्त्रीनगर रूग्णालयात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) डोंबिवली, धारापा, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) तसेच इतर वैद्यकीय संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या बैठकीला आयएमएचे ज्येष्ठ नेते डॉ. मंगेश पाटे, आयएमए डोंबिवलीच्या अध्यक्षा डॉ. सुचित्रा कामथ, सचिव डॉ. नयना चौधरी, शास्त्रीनगर रूग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सादिया पिंजारी, डॉ. प्रीतम आंबेकर, डॉ. श्रुती पत्की यांच्यासह रूग्णालयातील इतर डॉक्टर, तसेच धारापा, निमा आणि विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
शास्त्रीनगर रूग्णालयात ६ जुलैरोजी रात्री आठव्या सुमारास तेथील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. डॉक्टरांनी कामबंद आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), धारापा, निमा, आदी विविध वैद्यकीय संघटनांनी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणत शासन, प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत.
या प्रकरणावरून राजकीय आरोप, प्रत्यारोपही रंगले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भातील विविध मागण्या, रूग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणे, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना निर्भय वातावरणात सेवा देता यावी, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले, कायदा हातात घेणाऱ्या कुणालाही भाजपा-महायुती सरकार पाठीशी घालणार नाही. या प्रकरणात कायद्यानुसार योग्य ती कारवाई होईलच, शिवाय वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी सुरक्षित वातावरणात निःस्वार्थपणे सेवा देऊ शकतील, यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांबाबत सरकार सकारात्मक आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भातील मागण्यांवर गांभीर्याने विचार करून आवश्यक निर्णय घेतले जातील, असेही ते म्हणाले.