Dombivli News | शास्त्रीनगर पाठोपाठ टिटवाळ्यातील रूग्णालयात धक्कादायक प्रकार : बाळंतीणीच्या पोटावर चुकीची शस्त्रक्रिया?

महिलेच्या पोटात इन्फेक्शन झाल्याची तक्रार, कुटुंबीयांच्या आरोपानंतर वैद्यकीय आरोग्य क्षेत्रात खळबळ
Dombivli News | शास्त्रीनगर पाठोपाठ टिटवाळ्यातील रूग्णालयात धक्कादायक प्रकार : बाळंतीणीच्या पोटावर चुकीची शस्त्रक्रिया?
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात रूग्णसेवेवरून झालेल्या हिंसाचाराची घटना ताजी असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या टिटवाळ्यातील रूग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आणखी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सिझेरियन प्रसूतीदरम्यान चुकीच्या पद्धतीने टाके घातल्यामुळे एका महिलेच्या पोटात मोठ्या प्रमाणात संसर्ग (इन्फेक्शन) झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. धनश्री सानप असे या महिलेचे नाव असून तिने एका मुलीला जन्म दिला आहे. मात्र सिझेरियन दरम्यान तिच्यासोबत जो प्रकार घडला त्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे.

सिझेरियनदरम्यान डॉक्टरांकडून मोठी चूक ? 

कल्याण पूर्वेकडे कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या धनश्री सानप या गरोदर महिलेला काही दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी कल्याणच्या शक्तीधाम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना प्रसुतीसाठी टिटवाळ्यातील केडीएमसीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच ठिकाणी धनश्री यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र सिझेरियनदरम्यान चुकीच्या पद्धतीने टाके घालण्यात आले. त्यामुळे धनश्री यांच्या पोटात मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झाल्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोटावर गोधडीप्रमाणे टाके ?

बाळंतीण झालेल्या महिलेच्या सिझेरियननंतर मोठे मोठे टाके टाकण्यात आले आहेत. या दरम्यान महिलेच्या प्रकृतीला काही गंभीर धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. केडीएमसीच्या रूग्णालयांमध्ये यापूर्वीही निष्काळजीपणाच्या तक्रारी समोर आल्या असून या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा रूग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

केडीएमसीच्या डॉक्टरांचे स्पष्टीकरण

या संदर्भात केडीएमसीच्या शक्तीधाम रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, १४ जून रोजी धनश्री यांना शक्तिधाम रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. परत प्रसूतीसाठी त्यांना टिटवाळ्यातील केडीएमसीच्या रूग्णालयात पाठविण्यात आले. २४ तारखेला त्यांचे सिझर करण्यात आले. नंतर संबंधित महिला घरी गेली आणि परत पोटात त्रास होऊ लागल्याने त्या ९ तारखेला आमच्याकडे दाखल झाल्या.

पोटात इन्फेक्शनची दोन कारणाने होऊ शकतात. एक तर घरी महिलेने निष्काळजीपणा केला असेल किंवा सिझेरियन करताना काही तरी चूक झाली असेल. नक्की काय प्रकार घडला हे चौकशीनंतर समोर येईल, असेही डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या घटनेबाबत केडीएमसी प्रशासन आणि आयुक्त अभिनव गोयल काय भूमिका घेतात, तसेच या आरोपांवर त्यांचे काय स्पष्टीकरण असणार ? याकडे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news