Dombivli Doctor Assault Case : आधारवाडी कारागृहात आरोपींची ओळख परेड, डॉक्टरांनी पाचही आरोपी अचूक ओळखले

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय हिंसाचार प्रकरणात नवी अपडेट
Dombivli Doctor Assault Case
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात झालेल्या हिंसाचार प्रकरणातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सृष्टी बाविस्कर यांच्यासह डॉ. वैभव साळुंखे यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात, शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्यासह उर्वरित चारही आरोपींची ओळख परेड मंगळवारी दुपारी कल्याणचे तहसीलदार विकास गारूडकर यांच्यासमक्ष आधारवाडी कारागृहात पार पडली.

अत्यंत कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या या ओळख परेडच्या वेळी पीडित डॉक्टर डॉ. साळुंखे यांनी आरोपी रमेश म्हात्रे यांच्यासह इतर चारही आरोपींना अचूक ओळखल्याची माहिती डॉ. साळुंखे यांचे वकील ॲड. अभिनय अडसुळ यांनी दिली.

Dombivli Doctor Assault Case
Teacher Property killed Case-संपत्तीसाठी आधी 'सही'... मग 'श्वास'च रोखला ! कोट्यवधींच्या संपत्तीसाठी 'मृत्यूचा करार'

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अखंड यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीनगर रुग्णालय हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरू आहे. रमेश म्हात्रे यांनी ज्या पद्धतीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत डॉ. वैभव साळुंखे यांना मारहाण केली आणि स्त्रीरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. सृष्टी बाविस्कर यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली, या सर्व प्रकाराबद्दल उच्च न्यायालयाने वेळोवेळी तीव्र नाराजी व संताप व्यक्त करत रमेश म्हात्रे यांच्यासह इतर आरोपींना जामीन देण्यास नकार दिला आहे.

कर्तव्यावर असताना झालेल्या मारहाणीनंतर डॉ. वैभव साळुंखे यांनी जिवाच्या भीतीपोटी आईसह डोंबिवलीहून वाशिम जिल्ह्यातील मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी न्यायालयासमोर जबाब नोंदवण्यासाठी अनेक वेळा डॉ. साळुंखे यांच्याशी संपर्क साधला, मात्र सुरक्षेची हमी मिळत नसल्याने ते जबाबासाठी न्यायालयात येत नव्हते. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून त्यांचा जबाब वाशिम येथील जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पोलिस बंदोबस्तात नोंदविण्यात आला. ओळख परेडसाठी डॉ. साळुंखे यांना कल्याणला आणताना पोलिस बंदोबस्त मिळणे आवश्यक असल्याची मागणी त्यांचे वकील ॲड. अभिनय अडसुळ यांनी केली होती. त्याची दखल घेत डॉ. साळुंखे यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात मंगळवारी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात आणण्यात आले.

Dombivli Doctor Assault Case
Bhiwandi Auto Rickshaw Baby Birth|खड्ड्यांनी कळा वाढवल्या; रुग्णालयाआधीच रिक्षात बाळाचा जन्म!

वरिष्ठ पोलिस अधिकारी व तुरुंगाधिकारी यांच्या उपस्थितीत कल्याणचे तहसीलदार विकास गारूडकर यांच्यासमक्ष डॉ. वैभव साळुंखे यांना ओळख परेडसाठी आरोपी रमेश म्हात्रे (वय ७१) याच्यासह सहआरोपी रमेश लक्ष्मण पवार (५०), प्रकाश उद्धव निकम (३५), अक्षय शरद कारंडे (३०) आणि साधना संजय कारंडे (५२) यांच्यासमोर उभे केले. त्यावेळी डाॅ. साळुंखे यांनी 'आपणास शिवीगाळ करत मारहाण करणारे हेच इसम आहेत', असे तपास यंत्रणेला सांगितले.

धमक्यांची तपास यंत्रणांकडून नोंद

या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपींकडून पीडित डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्यांचे फोन कॉल्स आल्याचा मुद्दाही समोर आला आहे. तपास यंत्रणेने याची गांभीराने नोंद घेतली आहे. हिंसाचाराच्या या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय संघटनांकडून केली जात आहे.

Dombivli Doctor Assault Case
UMC PRO Acquitted | अत्याचार प्रकरणी उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे निर्दोष

दबाव टाकणाऱ्यांचीही चौकशी होणार

डॉ. वैभव साळुंखे यांना कर्तव्यावर असताना रुग्णालयात मारहाण केल्यानंतर, रमेश म्हात्रे यांच्या चिथावणीवरून काही अज्ञातांनी तब्बल ९४ वेळा फोन कॉल्सद्वारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे. हे सर्व कॉल्स डॉ. साळुंखे यांना त्यांच्या मोबाईलवर आल्याचे तांत्रिक तपासातून उघड झाले आहे. अनोळखी व्यक्तींनी टाकलेल्या अशा दबावामुळे जिवाच्या भीतीपोटी डॉ. साळुंखे यांनी त्यांचा मोबाईल काही दिवस बंद ठेवला होता. या फोन कॉल्सची तांत्रिक तपासणी यंत्रणेकडून करण्यात येत आहे. दबाव टाकणाऱ्यांनाही चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news