Dombivali Crime : लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या दोन्ही मुली गर्भवती; मानपाडा-रामनगर पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

Dombivali Crime : लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या दोन्ही मुली गर्भवती; मानपाडा-रामनगर पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील महिलांसह अल्पवयीन तरूणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याणच्या रेल्वे यार्डात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या भागांत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांतून उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या दोन्ही मुली गरोदर राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मानपाडा आणि रामनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही पीडितांचे लैंगिक शोषण करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

पहिली घटना: उत्तर प्रदेशातून आरोपीला अटक

मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर आरोपी काजू निषाद (वय २३) हा उत्तर प्रदेशात पसार झाला होता. अलीकडेच पीडित मुलगी गरोदर राहिल्याचे तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. यानंतर पीडित मुलीला सोबत घेऊन कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी पीडित मुलीला धीर दिला आणि आरोपीला शोधून काढण्यासाठी पथकाला मार्गदर्शन केले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे राजू निषाद याचा माग काढत त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडी सुनावली आहे.

दुसरी घटना: प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

दुसऱ्या घटनेत रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १५ ते १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शुभम सरोज (वय २४) याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडित मुलीने त्याला विरोधही केला होता. आरोपी शुभम सरोज हा खाजगी व्हिडिओग्राफीचे काम करतो. त्याने केलेल्या लैंगिक शोषणामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार वैद्यकीय तपासणीनंतर समोर आल्यावर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

शनिवारी (दि. १६) सायंकाळी कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी पीडित मुलीच्या जबानीवरून गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आणि तातडीने पोलिसांचे विशेष पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना केले. पोलिसांनी जलद गतीने तपास चक्रे फिरवून शुभम सरोज याला अटक केली. रविवारी (दि. १७) त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news