

Dombivli Railway Yard Attack
डोंबिवली : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोडला असलेल्या तुकारामनगर परिसरात राहणाऱ्या दहा जणांच्या टोळक्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात राजाजी रोडला पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रेल्वेच्या वाहनतळावरील नियंत्रक जबर जखमी झाला. ३७ वर्षाच्या या नियंत्रकाला लाथा-बुक्क्यांसह क्रिकेट स्टम्प आणि लोखंडी सळ्यांनी बेदम मारहाण तर केलीच, शिवाय त्याला चाकूने भोसकले. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली असून पोलिस हल्लेखोर टोळक्याचा शोध घेत आहेत.
या हल्ल्याप्रकरणी आजदे गावात राहणारे रेल्वेच्या वाहनतळाचे व्यवस्थापक दिलीप साळवे (५५) यांनी रामनगर पोलिस ठाण्यात सोमवारी सकाळी तक्रार दाखल केली आहे. पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या सांगावात राहणारे नियंत्रक सुरज वाघरी (३७) सशस्त्र टोळक्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कुणाल परब, प्रणव सावंत आणि इतर दहा जणांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या वाहनतळाचे व्यवस्थापक दिलीप साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरज, आकाश आणि अमित वाघरी हे तिघे भाऊ आहेत. यातील सुरज हा रेल्वेच्या वाहनतळावर नोकरी करतो. सुरजचा भाऊ आकाश आणि आयरे रोडला असलेल्या तुकारामनगर भागातील काही तरूणांचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादानंतर आकाशचा शोध घेत विनायक, कुणाल परब, प्रणव सावंत आणि इतर दहा जण रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास राजाजी रोडला असलेल्या स्वामी नारायण मंदिराजवळील रेल्वेच्या वाहनतळावर दांडके, स्टम्प, चाकू घेऊन दुचाकीवरून आले. तेथे सुरज वाघरी काम करत होता. सशस्त्र टोळक्याने आकाश वाघरी आणि ओमकार बेडे कुठे आहेत ? असे विचारल्यावर सुरजने आपणास माहिती नसल्याचे उत्तर दिले. टोळक्यातील एका तरूणाने नाव विचारले असता सुरजने स्वतःचे नाव सांगितले.
हाच आकाशचा भाऊ असल्याची खात्री पटल्यानंतर टोळक्याने सुरजवर हल्ला चढविला. दहा जणांनी मिळून सुरजला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर लाकडी दांडके, स्टम्पने प्रहार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाहेर फरफटत आणून त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात सूरज वाघरी जबर जखमी होऊन आडवा झाला. त्यानंतर आपण पकडले जाऊ नये यासाठी टोळक्याने वाहनतळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह विद्युत केबल देखिल तोडल्या. वाहनतळावरील काही दुचाक्यांची तोडफोड करून टोळक्याने तेथून पळ काढल्याचे व्यवस्थापक दिलीप साळवे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
रात्री साडेबाराची वेळ असल्याने एकट्या पडलेल्या सुरजच्या बचावासाठी कुणीही पुढे आले नाही. काही वाहन चालक वाहनतळावर वाहने नेण्यासाठी आले. त्यांना पुढे आला तर तुम्हाला मारून टाकू, अशी धमकी टोळक्याने देऊन दहशत निर्माण केली. त्यानंतर टोळक्याने तेथून पळ काढला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या सूरज वाघरीवर केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उपचार करण्यात आले. रामनगर पोलिसांनी फरार टोळक्याचा शोध सुरू केला आहे.