

डोंबिवली : चोरीच्या गुन्ह्यात बाप जेलमध्ये असल्याने लेकीचा सांभाळ करायला मावशी घेऊन गेली, मात्र काही कळायचे वय नसल्याने हे ४ वर्षांचे बाळ प्रात:विधीबाबत अनभिज्ञ होते. समज नसल्याने वारंवार सांगूनही बाळाच्या वागणुकीत सुधारणा होत नाही. त्यामुळे चिडलेल्या काकाने केलेल्या मारहाणीत बाळाचा मृत्यू झाला. हा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी मावशी आणि काकाने या बाळाचा मृतदेह गायब केला खरा मात्र कोळसेवाडीच्या चाणाक्ष पोलिसांनी अखेर बाळाच्या खुनाचा एक वर्षांनी उलगडा केला आणि दोघा निष्ठूर मावशीसह काकाला बेड्या ठोकून गजाआड केले.
अत्यंत किचकट असलेल्या या खुनाचा उलगडा करण्यासाठी संदर्भात परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याणजी घेटे यांनी आपले अनुभव पणाला लावले. या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात असलेल्या महादेव अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ज्योती ज्ञानेश्वर सातपुते (२८) या गृहिणीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गेल्यावर्षी ६ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती. ज्योती यांच्या ४ वर्षीय भाचीला १३ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अपहरण झाल्याचे सांगितले होते. मुलीचे वडील राहूल घाडगे यांची मेव्हणी अपर्णा अनिल मकवाना उर्फ अपर्णा प्रथमेश कांबरी व तिचा नवरा प्रथमेश प्रविण कांबरी ( रा. भिवपुरी, जि. रायगड) या दोघांनी हे अपहरण केल्याचा फिर्यादीत म्हटले होते. या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला.
प्रथमेश कांबरी आणि त्याची पत्नी अपर्णा हे दोघे बेपत्ता चिमुरडीचे वडील राहूल घाडगे याच्या भिवपुरी येथील राहत्या घरी येणार असल्याची टीप कोळसेवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम राबवून प्रथमेश आणि त्याची पत्नी अपर्णा या दोघांना त्यांच्या भिवपुरी रोडला असलेल्या चिंचवली या मूळ गावातून ताब्यात घेतले. या दाम्पत्याची कसून चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या दाम्पत्याने मुलीला सांभाळ करायला नेले. तिचे कळण्याचे वय नव्हते. मुलगी कुठेही प्रात:विधी करायची. हे या दाम्पत्याला रूचत नव्हते. वारंवार सांगूनही मुलीची डोकेदुखी वाढत चालली होती.
एकेदिवशी संतापाचा भरात प्रथमेशने तिला मारहाण केली. या मारहाणीत हा चिमुकला जीव गतप्राण झाला. आता करायचे काय ? मुलीच्या मृत्यूची विल्हेवाट लावायची कशी ? हा प्रश्न प्रथमेश आणि त्याची पत्नी अपर्णा या दोघांना पडला. दोघांनी मिळून मुलीचा मृतदेह गोणीत टाकून त्यावर गादी गुंडाळली. त्यानंतर सामसूम प्रहरात हा मृतदेह चिंचवली गावाच्या शिवारात निर्जनस्थळी फेकून दिला. हा सारा प्रकार प्रथमेश आणि त्याची पत्नी अपर्णा या दोघांनी पोलिसांसमोर कथन केला. अपहरण करून चार वर्षीय निरागस बाळाची अशा पद्धतीने हत्या केल्याची कबूली देणाऱ्या या दाम्पत्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.