

Dombivli Shastri Nagar Hospital Ramesh Mhatre Case
डोंबिवली : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याच्या बहुचर्चित प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या चार साथीदारांविरोधात विष्णूनगर पोलिसांनी कल्याण न्यायालयात तब्बल 1832 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पार पडली असून, या खटल्याची सुनावणी जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 15 सप्टेंबरपासून खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
सोमवारी 6 जुलैच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका गरोदर महिलेच्या उपचारावरून झालेल्या वादातून शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे खासगी अंगरक्षक रमेश पवार, प्रकाश निकम आणि अक्षय कारंडे यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर रमेश म्हात्रे यांच्यासह प्रमोद निकम, रमेश पवार, अक्षय कारंडे आणि साधना कारंडे हे पाचही आरोपी शुक्रवारी कल्याण न्यायालयात हजर झाले.
जलदगती न्यायालयात न्यायाधीश एन. पी. वासाडे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. आरोपींच्या वतीने तीन वकिलांनी संयुक्तपणे युक्तिवाद केला. 1832 पानांचे दोषारोपपत्र असल्यामुळे त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी रमेश म्हात्रे यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे काही दिवसांची मुदत मागितली. या मागणीवर न्यायालयाने अद्याप अंतिम निर्णय दिलेला नसून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी 15 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे.
सरकारी पक्षाने सादर केलेल्या कागदपत्रांसह साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर मांडण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सरकारी पक्षाकडून कागदपत्रे व साक्षीदारांची यादी सादर झाल्यानंतर कोणती कागदपत्रे मान्य आहेत आणि कोणत्या कागदपत्रांवर आक्षेप आहे, याबाबत आरोपींच्या बाजूने युक्तिवाद केला जाईल. मात्र या प्रकरणाची सुनावणी विनाकारण लांबवू नये, अशी न्यायालयाची स्पष्ट भूमिका आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन महिन्यांच्या कालावधीत प्रकरणाचा निकाल देण्याचे उद्दिष्ट असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे सुनावणी लांबणीवर न टाकता लागोपाठ तारखा देऊन खटला चालवण्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्यासह पाच आरोपींवर गंभीर आरोप करण्यात आले असून, दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेला वेग आला आहे. आता 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नियमित सुनावणीत सरकारी पक्षाकडून कागदपत्रे आणि साक्षीदारांचे म्हणणे मांडले जाईल.
दरम्यान, शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीनंतर हे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले होते. दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रत्यक्ष खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. तीन महिन्यांत निकाल देण्याच्या न्यायालयाच्या भूमिकेमुळे पुढील सुनावणीकडे कल्याण-डोंबिवलीकरांसह वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शुक्रवारी कल्याण न्यायालयात हजर राहून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, रमेश म्हात्रे यांनी कल्याण मुख्यालयात सुरू असलेल्या सर्वसाधारण सभेत हजेरी लावली. यावेळी केडीएमसी सचिवांसह शिवसेना नगरसेवकांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. आजूबाजूला बसलेल्या पक्षाच्या नगरसेवकांशी त्यांनी चर्चा केली. सुमारे 15 मिनिटे महासभेत उपस्थित राहिल्यानंतर ते तिथून निघून गेले.