Thane News : शिवसेनेच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द; ठाण्यात शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का

Thane News : शिवसेनेच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द; ठाण्यात शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का
Published on
Updated on

ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ५ (अ) मधील शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण ऊर्फ सुलेखा शिवाजी सूर्यवंशी यांचे नगरसेवकपद रिक्त झाल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे यांनी १६ जून २०२६ रोजी दिलेल्या आदेशाच्या आधारे त्यांचे नगरसेवकपद आपोआप संपुष्टात आल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यामुळे ठाण्यातील सत्ताधारी शिंदे गटाच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

सुलेखा चव्हाण या प्रभाग क्रमांक ५ (अ) मधून बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांच्या अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासंदर्भातील तपासणी समितीच्या निर्णयानंतर त्यांच्या नगरसेवकपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर समितीच्या १६ जून रोजीच्या आदेशाच्या आधारे महापालिका प्रशासनाने संबंधित पद रिक्त झाल्याची कार्यवाही केली आहे.

या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये १६ जून २०२६ पासून प्रभाग क्रमांक ५ (अ) मधील नगरसेवकपद रिक्त झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या रिक्त पदाच्या अनुषंगाने नियमोचित व योग्य ती पुढील कार्यवाही आपल्या स्तरावर करण्यात यावी, अशी विनंतीही विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

नगरसेवकपद रद्द झाल्याने पुढील निवडणूक प्रक्रिया कशी राबविली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे सुलेखा चव्हाण या बिनविरोध निवडून आल्याने त्यांच्या जागेवरील पुढील प्रक्रियेलाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या निर्णयामुळे नगरसेवकपद गमावण्याची वेळ आल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा धक्का मानला जात आहे. आता रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार की अन्य नियमांनुसार पुढील प्रक्रिया केली जाणार, याबाबत विभागीय आयुक्तांच्या स्तरावर होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटाच्या नऊ नगरसेवकांवर टांगती तलवार

नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द झाले असले, तरी शिवसेना शिंदे गटाच्या आणखी नऊ नगरसेवकांवर नगरसेवकपद रद्द होण्याची टांगती तलवार कायम आहे. उबाठा पक्षाचे दिव्यातील पदाधिकारी रविदास मुंडे यांनी यासंदर्भात निवडणूक विभागाकडे तक्रार केली असून यावर निवडणूक विभाग काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news