Dombivli Naxalite Arrest | नक्षलवाद्याला कामावर ठेवणाऱ्या तबेला मालकाची तब्बल ५ तास चौकशी!

डोंबिवली नक्षलवादी प्रकरणात मोठी अपडेट, एटीएसच्या कारवाईनंतर स्थानिक पोलिसांकडून चौकशी सुरू
Dombivli Naxalite Arrest
Dombivli Naxalite Arrest Pudhari
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : झारखंडच्या नक्षलवादी संजय यादव प्रकरणात एटीएसच्या कारवाईनंतर आता डोंबिवली पोलिसांनीही तपास चक्रांना वेग दिला आहे. डोंबिवलीसारख्या शांत आणि सुसंस्कृत शहरात नक्षलवाद्याला आश्रय कसा मिळाला ? त्याला काम कुणी दिले ? त्याला येथे आणणारे कोण ? आदी प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. नक्षलवाद्याला कामावर ठेवणाऱ्या तबेला मालकाची तब्बल ५ तास चौकशी करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.

    झारखंडच्या नक्षलवादी संजय यादव प्रकरणात एटीएस नंतर आता पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे. तबेला मालक अरविंद शेलार आणि कॅन्टीन चालक राजेश सिंग यांची ४ ते ५ तास सखोल चौकशी करण्यात आली. पोलिसांनी दोघांनावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. नक्षलवादी संजय यादव याच्याशी ओळख कशी झाली ? कामावर ठेवताना त्याची ओळखपत्रे तपासली होती का ? त्याचा पगार कसा ठरवला ? तो कुठे राहत होता ? त्याचे कोणाशी संपर्क होते ? ओळख लपवून ठाकुर्लीत राहून त्याने काही उपद् व्याप केले आहेत का ? अशा अनेक अंगांनी ही चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान दोघांचीही कसून उलटतपासणी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

    ठेकेदार आणि कॅन्टीन चालकाच्या माध्यमातून संजय यादवला तबेल्यात काम मिळाले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. २८ तारखेपासून दरमहा १२ ते १५ हजार रूपये पगारावर संजय तबेल्यात काम करत होता. तबेल्यातील कामाच्या आडून तो ठाकुर्लीत वास्तव्यास होता का ? त्याचा खरा हेतू काय होता ? तो येथे कुणाच्या संपर्कात होता ? याचा तपास पोलिस करत आहेत. संजयला डोंबिवलीत आणणारा कपिल देव हा एटीएसच्या ताब्यात आहे, त्याच्याकडूनही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असून त्यातून आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

   संबंधितांचे नक्षलवादाशी संबंध आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांकडून तपासली जात आहे. तबेला मालक, कॅन्टीन चालक आणि ठेकेदार यांचा या प्रकरणाशी नेमका किती संबंध आहे ? त्यांनी जाणीवपूर्वक आश्रय दिला होता का ? की त्यांची फसवणूक झाली आहे ? हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र डोंबिवलीसारख्या शहरात नक्षलवादी वास्तव्यास आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून पुढील तपासात आणखी मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे ठाकुर्ली आणि डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.