
डोंबिवली : टिटवाळ्यातील एका फिरस्त्या वृध्द महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिचे लचके तोडल्याची घटना ताजी असतानाच नरभक्षी कुत्र्यांच्या दहशतीचे लोण कल्याणातही पोहोचल्याचे एका घटनेतून अधोरेखित झाले आहे. कल्याण पश्चिमेकडे असलेल्या शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका आठ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. या मुलाच्या तोंडाला आणि गुप्तांगाला चावा घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे अबाल-वृद्धांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
कल्याण पश्चिमेतील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या अर्थव श्रीवास (8) या मुलाला कुत्र्याने लक्ष केले. त्याच्या गुप्तांग आणि तोंडाला कुत्र्याने चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अर्थव हा मोहिंदर सिंग काबूल सिंग शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता अथर्व ट्यूशनहून घरी परतत होता. घराजवळच्या गल्लीतून येत असताना मागून आलेल्या भटक्या कुत्र्याने त्याच्यावर अचानक झडप घातली. त्याच्या गुप्तांगाला आणि तोंडाला चावा घेतला. या घटनेमुळे मुलगा भयभीत होऊन भेदरलेल्या अवस्थेत घरी आला. घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितला. त्यानंतर अथर्वला तात्काळ केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात नेले. त्यानंतर त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात हलविण्यात आले. तेथून त्याची रवानगी मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात करण्यात आली. तेथे उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने करण्याची मागणी अथर्वचे वडिल पप्पू श्रीवास यांनी केली आहे. तर या भागाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. महानगरपालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी डॉग व्हॅन कार्यरत करावी, या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत आहे. एकीकडे सद्याचे अधिकारी एसी केबीनमध्ये बसून काम करतात. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांवर वाचक नसलेल्या आयुक्तांकडून जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांतून दिसून येत असल्याचा आरोप उगले यांनी केला.