

डोंबिवली, टिटवाळा : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील महागणपतीच्या टिटवाळ्यातील एका गृहसंकुलाच्या परिसरात शुक्रवारी (दि.6) मध्यरात्रीच्या सुमारास भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यात साठ वर्षांची वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. महिला अत्यंत गंभीररीत्या जखमी महिलेला प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक रुग्णालय गोवेली येथे नेण्यात आले होते. या महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला मुंबईतील सर जे. जे. रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. या महिलेची ओळख पटलेली नाही. ही महिला भिक्षेकरी किंवा कचरावेचक असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
श्वानदंश
जानेवारी ते 4 डिसेंबर 2024 : 5644 श्वान दंश
जानेवारी ते डिसेंबर 2023 : 5440 श्वान दंश
एप्रिल ते डिसेंबर 2022 : 4535 श्वान दंश
टिटवाळ्यातील रिजन्सी सर्वम् गृहसंकुलाच्या पाठीमागे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास 60 वर्षांची एक महिला पायी चालली होती. या महिलेला पाहून या भागातील चार भटकी श्वान तिच्या अंगावर धाऊन गेली. चारही श्वानांनी एकाच वेळी हल्ला केल्याने महिला रस्त्यावर कोसळली. भटक्या श्वानांनी कपडे फाडून शरीराला चावे घेऊन तिला घायाळ केले. या महिलेने सुरूवातीला श्वानांच्या तावडीतून सुटण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तथापी एकाचवेळी चारही श्वानांनी आक्रमकपणे हल्ला करत असल्याने तिला उठणे शक्य झाले नाही. या हल्ल्यात गंंभीर जखमी झालेली महिला घटनास्थळीच बेशुध्द झाली. भटक्या श्वानांनी या महिलेला ओढत गृहसंकुलाच्या दिशेने नेले.
आक्रमक श्वानांशी प्रतिकार करण्याची शक्ती संपल्याने ही महिला निपचित पडून होती. परिसरातील काही रहिवाशांसह गृहसंकुलाच्या रखवालदारांना हा प्रकार कळताच सार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे श्वानांनी त्या महिलेला सोडून पळ काढला. जागरूक रहिवाशांनी तातडीने या महिलेला गोवेली येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. हा सारा प्रकार गृहसंकुल परिसरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्यांत कैद झाला आहे.या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला मुंबईतील सर जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंबरनाथ : भटक्या श्वानांवर नियंत्रण मिळवण्यात अंबरनाथ नगरपालिका पुरती अपयशी ठरली असल्याने शहरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वर्षभरात 5644 लोकांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे भटके श्वान लहान मुलांवर हल्ला चढवून त्यांचे लचके तोडत असल्याने अंबरनाथ मध्ये चिंता व्यक्त होत आहे.शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याचा त्रास अंबरनाथनाथकरांना सहन करावा लागत आहे. यंदाच्या जानेवारी ते 4 डिसेंबर 2024 या वर्षी भटक्या श्वानांनी तब्बल 5644 लोकांना चावा घेतला असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरातील भटक्या श्वानांची नसबंदी करून त्यांची संख्या नियंत्रणात आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून पादचार्यांनाही या भटक्या श्वानांच्या हल्ल्याला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. भटक्या श्वानांचा सुळसुळाट वाढला असल्याने नागरिकांना पायी चालणे जीवावर बेतत आहे.मागील आठवड्यात शहराच्या पश्चिम भागातील दोन लहानग्यांवर भटक्या श्वानांनी हल्ला चढवून त्यांचे लचके तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानाने या मुलांना सुरक्षित करण्यात आले. मात्र असे हल्ले वारंवार होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान याबाबत काही महिन्यांपुर्वी विद्यामान खासदार सुरेश ।(बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या समवेत उबाठा गटाचे विधानसभा संघटक किशोर शुक्ला यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदू राणी जाखड यांना भटक्या श्वानांच्या समस्येबाबत एक पत्र दिले होते. महापालिकेच्या आरक्षित जागेवर या भटक्या श्वानांसाठी एक सेंटर उभारून त्यात त्यांच्या डॉक्टर, केअर टेकर पर्यंत उपायोजना करत 5 वर्षांच्या प्रायोगिक तत्वावर एक प्रोजेक्ट उभारून उपायोजना करण्याचे सुचविले होते. मात्र याबाबत काहीही उपाययोजना होऊ शकल्या नाहीत.