

अक्षय आंब्रे
दिवा: मध्य रेल्वेवरील दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा प्रवास आता पूर्णपणे छळवणूक करणारा ठरत आहे. सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी दिवा स्थानकातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना तब्बल २ ते ३ तास प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहावे लागत आहे.
कल्याण आणि डोंबिवलीवरून येणाऱ्या लोकल गाड्या आधीच इतक्या प्रचंड खच्चून भरलेल्या असतात, की दिवा स्थानकात आल्यावर प्रवाशांना त्यात पाऊल ठेवायलाही जागा नसते.
गाड्यांमधील अलोट गर्दीमुळे कोणालाही आत चढणे शक्य होत नसल्याने दिवावासीय स्वतःच्याच स्थानकात हतबल झाले असून रेल्वे प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेविरोधात प्रवाशांमध्ये तीव्र संतापजनक लाट उसळली आहे.
सकाळी कामावर जाण्याच्या घाईत असणाऱ्या दिवावासीयांना लोकल ट्रेन मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. एकामागोमाग एक येणाऱ्या गाड्या आधीच फुल्ल असल्याने आणि डब्यातील प्रवासी चढू देत नसल्याने, प्रवाशांच्या डोळ्यांदेखत ४ ते ५ गाड्या निघून जातात.
परिणामी, २ ते ३ तास प्लॅटफॉर्मवरच वाया जात असल्याने अनेकांना कामावर पोहोचण्यास उशीर होतो, तर काहींना घरी परत जावे लागते. "आम्ही रेल्वेला दरमहा पासचे पैसे मोजतो, मग आमच्या वेळेची आणि जीवाची रेल्वे प्रशासनाला काहीच किंमत नाही का?" असा संतप्त सवाल महिला व पुरुष प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
गाडीत जागा मिळत नसल्याने शेकडो प्रवासी दाराला लटकून अत्यंत जीवघेणा प्रवास करत आहेत. यामध्ये महिला प्रवाशांचे अतोनात हाल होत असून, त्यांना चालत्या गाडीत चढणे अशक्य होत आहे. गाडीत शिरण्याच्या नादात अनेकदा महिला आणि पुरुष प्रवाशांचे पाय घसरून प्लॅटफॉर्मवर पडल्याच्या घटना घडत आहेत.
दररोज होणाऱ्या या जीवघेण्या अपघातांमुळे दिवावासीयांचा प्रवास मृत्यूच्या छायेत सुरू आहे. "रेल्वे प्रशासन आणखी किती प्रवाशांच्या बळींची वाट पाहत आहे?" असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे.
अरुंद जिने आणि अपुरे प्लॅटफॉर्म
दिवा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना स्थानकातील पायाभूत सुविधा मात्र अत्यंत तोकड्या आहेत. स्थानकातील अपुरे प्लॅटफॉर्म आणि अत्यंत अरुंद जिने यामुळे गर्दीच्या वेळी येथे चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण होते.
एकाच वेळी दोन गाड्या आल्यास जिन्यांवर प्रवाशांची मोठी कोणी होते, ज्यामुळे दररोज अपघाताची टांगती तलवार प्रवाशांच्या डोक्यावर असते. त्यातच ऐन गर्दीच्या वेळी लोकल गाड्यांची संख्याही अत्यंत कमी आहे. सर्व जलद गाड्यांना थांबा आणि थेट लोकल हीच एकमेव सुटकाया समस्येवर तात्कालिक उपाय म्हणून सर्व जलद गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
जलद गाड्या थांबल्यास धीम्या गाड्यांवरील ताण कमी होईल. तसेच, जोपर्यंत दिवा स्थानकावरून सुटणारी थेट दिवा-सीएसएमटी लोकल सुरू होत नाही तोपर्यंत दिवावासीयांची या मरणयातनेतून सुटका होणार नाही.
दिवा स्थानकात सकाळी लोकल मिळवण्यासाठी २ ते ३ तास प्लॅटफॉर्मवरच वाया जात असल्यामुळे चाकरमान्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. गाड्यांमध्ये चढता न आल्यामुळे दररोज शेकडो प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला उशीर होतो. कंपनीच्या नियमांनुसार सतत 'लेट मार्क' लागत असल्यामुळे कित्येक दिवावासीयांचा 'हाफ डे' कापला जातो, तर अनेकांना हक्काची सुटी गमावावी लागत आहे. रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे दिवावासीयांना मानसिक त्रासासोबतच हा मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
- सुशील कदम, स्थानिक रहिवाशी, दिवा