

विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेतील बायो-मायनिंग आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात झाल्याचा आरोप असलेल्या तब्बल 64 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वसई विरार महापालिका आयुक्त व पोलिसांना भेट घेऊन प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढवून तो आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवावा, अशी मागणी केली. सध्या पोलीस सब-इन्स्पेक्टर स्तरावर तपास सुरू असल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
या प्रकरणात विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी यापूर्वी विविध ठिकाणी तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर आता पोलिसांकडेही तक्रार करण्यात आली असून, या कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आर्थिक स्वरूपाचा मोठा गैरव्यवहार असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देणे आवश्यक असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार संबंधित महापालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करणे अपेक्षित असताना अद्याप अशी तक्रार का दाखल करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कथित गैरव्यवहाराशी संबंधित अधिकारी तपासाच्या प्रक्रियेत प्रभाव टाकू नयेत यासाठी त्यांना तत्काळ त्यांच्या पदावरून हटवावे, अशी मागणी सोमय्यांनी केली.
या प्रकरणातील CAGच्या अहवालाचाही त्यांनी उल्लेख केला. अहवाल महापालिकेला मान्य नसेल तर तसे स्पष्ट करावे; मात्र अहवाल मान्य असेल तर त्यानंतर संबंधित अधिकारी आणि कंपन्यांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी केला.
कथित घोटाळ्यात सहभागी कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्यासोबतच अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली. तसेच या प्रकरणाचा तपास पुढे अंमलबजावणी संचालनालय, आयकर विभागापर्यंत जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, आयुक्तांनी चौकशी करण्यास सहमती दर्शवल्याचा दावा सोमय्यांनी केला.