

Dipesh Mhatre joins BJP
डोंबिवली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या गळाला उबाठाचा बडा नेता लागला आहे. डोंबिवली, कल्याण ग्रामीणचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे रविवारी समर्थकांसह भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. म्हात्रे स्वगृही शिंदे गटात परतणार होते. मात्र भाजपाने त्यांना गळाला लावले आहे. हा शिवसेनेच्या दोन्ही गटांना मोठा धक्का आहे.
गणेशोत्सवादरम्यान रविंद्र चव्हाण हे दिपेश म्हात्रे यांच्या मोठागावातील नवनाथ कृपा निवासस्थानी गणपती दर्शनासाठी गेले होते. तेथे झालेल्या चर्चांव्यतिरिक्त चव्हाण-म्हात्रे यांचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. तेव्हापासून दिपेश म्हात्रे भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या उठत होत्या. एकीकडे दिपेश म्हात्रे यांच्या भाजपा प्रवेशामागे म्हात्रे कुटुंबीयांचे नातेवाईक असलेले माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचेही प्रयत्न महत्त्वाचे मानले जातात. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण राजकीय खेळी केली आहे.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे हे त्यांच्या समर्थक आणि 7 ते 8 माजी नगरसेवकांसह भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेशाचा हा सोहळा उद्या रविवारी डोंबिवली जिमखाना येथे आयोजित करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या सोहळ्याला भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दिग्गजांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा समावेश आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीची भाजपाने जोरदार तयारी केली आहे. महापौर भाजपाचाच बसणार असल्याचे रविंद्र चव्हाण यांनी यापूर्वीच जाहीरपणे ठणकावून सांगितले आहे.
पुन्हा शिंदे गटात जाणार असल्याची होती चर्चा
केडीएमसीचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांचे सुपुत्र दिपेश म्हात्रे हे कल्याण-डोंबिवलीतील मातब्बर आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. 2009 पासून ते नगरसेवक आहेत. या कालावधीत महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची जबाबदारी त्यांनी दोनदा सांभाळली आहे. त्यांच्या कुटुंबाचाही महानगरपालिकेच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. त्यांचे वडील पुंडलिक म्हात्रे यांनी यापूर्वी महापौरपद भूषवले आहे. आई आणि बंधू देखील नगरसेवक होते. अशी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या चेहऱ्याचा भाजपामध्ये प्रवेश हा ठाकरे गटासाठी खूप मोठा धक्का आहे. आधी हेच दिपेश म्हात्रे पुन्हा शिंदे गटात जाणार असल्याची राजकीय गोटात चर्चा रंगली होती. तथापी ते भाजपामध्ये प्रवेश करणाार असल्यामुळे हा शिंदे गटासाठीही धक्का मानला जात आहे.