

डोंबिवली : कुणी निंदा...कुणी वंदा...अर्थात कुणी काहीही म्हणो... दिबांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यायलाच हवे, यासाठी कल्याणकारांनी क्लृप्ती लढविली आहे. नवी मुंबई येथील नवीन विमानतळाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. या विमानतळाचे नामकरण होवो अगर न होवो, परंतु कल्याणच्या तिसगांवकऱ्यांनी त्यांना अपेक्षीत असलेल्या या विमानतळाचे दिपावलीच्या शुभमुहूर्तावर अशा प्रकारे नामकरण केले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ॲाक्टोबर रोजी पार पडले. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील भूमीपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन शाबूत ठेवणारा नेता म्हणून ओळखले जाणारे दिवंगत दिनकर बाळू पाटील म्हणजेच दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला मिळावे यासाठी जोरदार आंदोलने सुरू झाली. विमानतळाचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या विमानतळाचा उल्लेख दि. बा. पाटील यांच्या नावानेच केला जाईल अशी उत्सुकता होती. तथापी नामकरणाचा विषय बाजूला ठेवून पंतप्रधान मोदी यांनी विमानतळ सेवेसाठी सुरू केले.
'आमच्या मनानं घेतलाय ठाव, विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव’ या घोषणेसह आंदोलन सुरू करण्यात आले. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात भूमिपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहुसंख्य आगरी/कोळी समाजात या विषयी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. दिबांची राजकीय कारकीर्द सुमारे पाच-साडेपाच दशकांची होती. नवी मुंबईच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विमानतळ उभे रहात असताना येथील आगरी-कोळी, शेतकरी, प्रकल्पग्रस्त समाजाचा संघर्ष सरकार विसरणार का ? असा प्रश्न गावोगावी विचारला जाऊ लागला. जगाच्या नकाशावर चर्चेत असणाऱ्या प्रकल्पांचा गाजावाजा सुरू असताना वडीलधाऱ्यांच्या संघर्षाचे, त्यांनी दिलेल्या जमिनीचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या अस्मितेचे काय ? असा सवाल भूमीपुत्रांना नव्या संघर्षाच्या दिशेने ओढू लागला. या अस्मितेच्या केंद्रस्थानी ठरले ते दिबा...अशा दिबांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी कल्याणकरांनी क्लृप्ती लढविली आहे. पुणे लिंक रोडला असलेल्या दुभाजकावरील पोलवर लावण्यात आलेला हा नवी मुंबई विमानवळाच्या नामकरणाचा फलक नागरीकांचे लक्ष वेधून घेत आहे.
लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई 36 KM FROM TISGAON सौजन्य श्री तिसाई ग्रामस्थ मंडळ व नियोजन समिती, तिसगांव यांनी हे फलक लावले आहेत. हे फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.