डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai Airport) नामकरणास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे. शासनाचा या संदर्भातील ठराव केंद्र सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या ठरावास लवकरात लवकर केंद्राची मान्यता मिळावी, यासाठी सोमवारी लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या सदस्यांची केंद्रीय उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने केंद्रीय उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांच्या समवेत दिल्लीत बैठक संपन्न झाली.
या बैठकीत सदरचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयात पाठविण्यात आला असून लोकनेते दिबा पाटील यांचे नाव राज्याच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजूर झाल्यामुळे केंद्रातून लवकरात लवकर त्याची घोषणा केली जाईल, अशी ग्वाही उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी उपस्थितांशी संवाद साधताना दिली.
दिल्लीतील राजीव गांधी भवन येथे आयोजित केलेल्या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, शेकापचे नेते जे. एम. म्हात्रे, संतोष केणे यासह ठाणे, रायगड आणि नवी मुंबईतील (Navi Mumbai Airport) नेत्यांचा समावेश होता.
या बैठकीत नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नेहमीच पुढाकार घेऊन विधानसभेचे सभागृह दणाणून सोडणारे, भूमिपुत्रांच्या न्याय-हक्कासाठी आंदोलनाची हाक देणारे, प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा टक्क्यांच्या विकसित भूखंडाचा मोबदला ही योजना आखणारे, या योजनेद्वारे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे अस्तित्व टिकवून ठेवणारे, भूमिपुत्रांचे दैवत म्हणजे दि. बा. पाटील होते.
मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील म्हणाले की, नामकरणासाठी भूमिपुत्रांनी केलेल्या आंदोलनाला आता यश आले आहे. येत्या काही दिवसांतच दिबांचे नाव विमानतळाला देण्याची घोषणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.