

डोंबिवली : दुचाकीवरून येऊन पादचार्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लांबविणार्या धूम स्टाईल लुटणार्या लुटारूंनी आपला मोर्चा आता शहरी भागाकडून ग्रामीण भागाकडे वळविल्याचे 27 गावांपैकी एक असलेल्या डोंबिवली जवळच्या भोपर गावात घडलेल्या एका घटनेतून दृष्टिक्षेपात आले आहे. गुन्हेगारांना संधी मिळू नये, यासाठी स्वतःच्या सुरक्षेसाठी रहिवाशांनी, विशेषतः महिला/तरूणींनी सार्वजनिक ठिकाणी दागिन्यांचे प्रदर्शन टाळावे, असे पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जाते. तथापी याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा फायदा लुटारू घेत असतात, हे देखील वाढत्या घटनांमुळे अधोरेखित होत आहे.
या संदर्भात डोंबिवली जवळच्या भोपर गावातील जय साई समर्थ चाळीत राहणारे विघ्नेश चंद्रकांत कुडाळकर (43) हे कुटुंबीयांसह राहतात. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास विघ्नेश आणि त्यांची मुलगी माऊली हे दोघे घरात लागणारे किराणा सामान आणि भाजीपाला खरेदी करून पायी घरी चालले होते.
माऊलीने गळ्यात 7 ग्रॅम वजनाची 70 हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन परिधान केली होती. पाठीमागून आलेल्या दुचाकीवर दोनजण बसले होते. या दुकलीने अचानक त्यांची दुचाकी विघ्नेश आणि त्यांची मुलगी माऊलीच्या अंगावर घातली. दोघेही बाप-लेक या प्रकाराने घाबरले. इतक्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्याने माऊलीच्या मानेवर जोरात थाप मारून गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला.
दोन्ही हातात पिशव्या असल्याने विघ्नेश आणि माऊलीला प्रतिकार करता आला नाही. तरीही विघ्नेश यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मागे बसल्याने दुचाकीस्वाराला दुचाकी जोरात पळविण्याची सूचना करत दुचाकी भोपर गावातील गजानन चौकाच्या दिशेने दोघेही पसार झाले. या घटनेनंतर विघ्नेश आणि त्यांची मुलगी माऊलीने मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर चव्हाण आणि त्यांचे सहकारी फरार लुटारूंचा शोध घेत आहेत.