

कल्याण: महापालिका हद्दीत धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीची सख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. पावसाळा तोंडावर आला की पालीका प्रशासन मागच्या वर्षीच्या धोकादायक इमारतीच्या याद्या काढून त्यात नव्याने भरणा करून याद्या घोषित करण्यात मश्गूल असतात. पावसाळा तोंडावर आला तरी पालिकेच्या दहा प्रभागातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतीच्या याद्या तयार करतात. सद्य स्थितीत पालिका क्षेत्रात एकूण संख्या 470 आहे.
महापालिका क्षेत्रात एकूण 10 प्रभाग क्षेत्र कार्यालये आहेत. त्यापैकी अ आणि ब प्रभाग क्षेत्र वगळून आठ प्रभागात धोकादायक इमारतींची संख्या 367 आहे. तर अतिधोकादायक इमारतींची संख्या 103 इतकी आहे. धोकादायक इमारतींची दुरुस्ती करता येऊ शकते. मात्र अतिधोकादायक इमारतींची दुरुस्ती करता येत नाही.
त्यामुळे अतिधोकादायक इमारती या रहिवास मुक्त करणे हे एक आव्हान पावसाळ्या पूर्वी महापालिका प्रसासनाच्या समोर आहे. धोकादायक आणि अतिधोकायक इमारतीत राहणाऱ्यांची संख्या जवळपास 60 हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या नागरीकांचा जीव टांगणीला लागला आहे. मागच्या वर्षी कल्याण पूर्वेत सप्तृंगी या चार मजली इमारतीचे अंतर्गत दुरुस्तीचे काम सुरु असताना इमारतीचे मजले अंतर्गत भागात एकमेकांवर कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला होता.
धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती राहणारे रहिवासी हे बहुतांस भाडे तत्वावर राहतात. त्यांनी घरे खाली केली तर ऐन पावसाळयात जायचे कुठे ? जुन्या इमारतीचे भाडे कमी असते. नव्या इमारतीचे भाडे परवडणारे नाही. तसेच घरे खाली केल्यावर त्यांचा पुनर्वसनाचा दावा फोल ठरणार या भिती पोटी अनेकजण जीव मुठीत धरुन धोकादायक इमारतीचे घर खाली करीत नाही. धोकादायक इमारतीचा पुनर्विकास क्लस्टर योजनेतून केला जाणार आहे. तर भाडेकरु आणि मालक यांच्या वादामुळे बिल्डर इमारतीच्या पुनर्वसनाकरीता पुढे येत नाहीत.
पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींवर कारवाई हवी
पावसाळयापूर्वी महापालिका हद्दीतील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची माहिती गोळा करण्यात आली आहे.अतिधोकादायक इमारतीमधील नागरीकांना घरे खाली करण्याची नोटिस बजावण्यात आली आहे. धोकादायक इमारतींनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर महापालिका हद्दीतील 30 वर्षे जुन्या इमारतींना स्ट्क्चरल ऑडिट करण्याच्या नोटिसा ही यापूर्वी देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिली.