

भाईंदर : दहिसर ते भाईंदर दरम्यानच्या मेट्रो रेल्वेचा दहिसर ते काशिगाव दरम्यानचा पहिला टप्पा येत्या फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. पालिका मुख्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
यामुळे मिरा-भाईंदरकरांची प्रतीक्षा अखेर निकाली निघणार असल्याचे तूर्तास स्पष्ट झाले आहे. दहिसर ते भाईंदर दरम्यानचा मेट्रो मार्ग दोन टप्प्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा दहिसर ते काशिगाव तर दुसरा टप्पा काशिगाव ते भाईंदर असा आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यातील मेट्रो गेल्या डिसेंबर 2025 अखेर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या मेट्रो मार्गाच्या कामाला सप्टेंबर 2019 मध्ये प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. मात्र यात सतत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ही मेट्रो सुरू होण्यास मोठा विलंब लागला.
मात्र यातील पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्ग सुरू होण्याच्या तयारीत असून हा मार्ग सुरू झाल्यानंतर मिरा-भाईंदरमधील प्रवासी, मेट्रो रेल्वेने थेट अंधेरी पर्यंत जाऊ शकणार आहेत. यामुळे मीरारोड सह काशिमीरा हद्दीतील प्रवाशांना पश्चिम रेल्वेच्या लोकलसह रस्ते वाहतुकीला मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने लोकलमधील गर्दी काही प्रमाणात सुसह्य होणार आहे. तसेच रस्ते वाहतुकीची कोंडी देखील काही प्रमाणात सुटणार असल्याचा दावा केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रो सुरू झाल्यास मिरा-भाईंदरमधील प्रवाशांचा प्रवास, विना वाहतूक कोंडीचा ठरणार असून त्यात त्यांचा वेळ मोठ्याप्रमाणात वाचणार आहे.
या मार्गावरून प्रवास करणाऱ्या मिरा-भाईंदरकरांना इंटरचेन्ज सुविधेनुसार मेट्रो 1 चा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट स्थानक 3 द्वारे थेट कुलाबापर्यंत प्रवास करता येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक व टर्मिनस आणि दक्षिण मुंबईतील मंत्रालय, विधान भवन येथे जाण्यासाठी देखील मेट्रोची इंटरचेन्जद्वारे सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील दहिसर ते काशिगाव मेट्रो मार्ग सुरू होण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र अनिवार्य ठरल्याने ते मिळाले किंवा नाही, त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्ग फेब्रुवारीमध्ये सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
दुसऱ्या टप्प्यातील काशिगाव ते भाईंदर दरम्यानची मेट्रो डिसेंबर 2026 अखेरपर्यंत सुरू होणार असून भाईंदर पश्चिमेपासून पूर्वेकडील प्रवाशांना मेट्रो रेल्वे इंटरचेन्ज सुविधेमुळे वेळेत विमानतळ गाठून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर देखील वेळेत दाखल होता येणार आहे. यामुळे मिरा-भाईंदरकरांचा प्रवास सुस्साट होणार असल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे.