

डोंबिवली : सन २००९ च्या कल्याण लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार-सभेत दाखविण्यात आलेल्या कथित व्हिडिओ प्रकरणात कल्याण न्यायालयाने माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समन्स बजावले आहे.
येत्या ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे याच प्रकरणात सहा ऑगस्टला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कल्याण कोर्टात हजर राहण्या बाबत आदेश देण्यात आले आहेत. या खटल्यात उद्धव ठाकरे यांच्यासह विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
हे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार वसंत डावखरे यांनी दाखल केले होते. मात्र फौजदारी खटल्यातील नियमित न्यायालयीन प्रक्रिया असल्याचे सांगून या वृत्ताचे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खंडण केले आहे. वसंत डावखरे यांचे निधन झाले असले तरी हा खटला न्यायालयात सुरू असून त्याच्या पुढील सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सन २००९ च्या लोकसभा निवड-णुकीत आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी २२ एप्रिल २००९ रोजी डोंबिवलीत झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी वसंत डावखरे यांचा कथित व्हिडिओ दाखवला होता.
त्या व्हिडिओमध्ये उमेदवार वसंत डावखरे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी पोलिस आणि निवडणूक आयोगाची पर्वा न करता कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र वसंत डावखरे यांनी हा दावा फेटाळून लावत संबंधित व्हिडिओतील वक्तव्य आपले नसल्याचे म्हटले होते. व्हिडिओतील मजकूर एडिट करून आपली बदनामी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.
फौजदारी खटल्यातील नियमित प्रक्रिया
अॅड. नीरज कुमार सदर वृत्त वस्तुस्थितीशी सुसंगत नसून दिशाभूल करणारे असल्याचा दावा शिवसेना प्रवक्ते तथा युवासेना शहर अधिकारी अॅड. नीरज कुमार यांनी केला आहे. वास्तविक कल्याण न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध कोणतेही समन्स, नोटीस अथवा वॉरंट जारी केलेले नाही. सन २००९ मधील एका प्रलंबित फौजदारी प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यासह आणखी तीन जण आरोपी आहेत. त्या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे कलम ३१३ अंतर्गत स्टेटमेंट नोंदविण्यासाठी दिनांक ५ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही फौजदारी खटल्यातील नियमित न्यायालयीन प्रक्रिया आहे
उद्धव ठाकरेंची कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी अॅड. जयेश वाणी काही दिवसांपासून ५ ऑगस्टला उद्धव ठाकरे प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहतील, अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेचे प्रवक्ते तथा वकील अॅड. जयेश वाणी यांनी हे वृत्त फेटाळले आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, २००९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सीडी प्रकरणात आरोपी करण्यात आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ५ ऑगस्ट रोजी कल्याण न्यायालयात हजर राहणार आहेत. मात्र ही हजेरी प्रत्यक्ष न होता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल, अशी माहिती अॅड. वाणी यांनी दिली.