कल्याण-डोंबिवलीतील १० प्रभाागांत १५०० कर्मचा-यांकडून स्वच्छता अभियान

कल्याण-डोंबिवलीतील १०  प्रभाागांत १५०० कर्मचा-यांकडून स्वच्छता अभियान

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : गणरायांच्या आगमनाची  जोरदार तयारी सुरू आहे. बाप्पाचे आगमन खड्डेविरहित रस्त्यांवरूनच व्हावे यासाठी एकीकडे कल्याण-डोंबिवलीतील उखडलेले रस्ते दुरुस्ती कामाला केडीएमसीने वेग दिला आहे. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीत कुठेही घाण-कचरा दिसू नये, यासाठी कल्याण-डोंबिवलीतील 10 प्रभाागांत अधिकाऱ्यांसह 1500 कर्मचारी स्वच्छता अभियानात उतरले आहेत. त्यामुळे येत्या दोन-चार दिवसांत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र जवळपास घाण व कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्‍न केले जात आहेत.

केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग मार्फत गणेशोत्सवानिमीत्त सर्व प्रभाग क्षेत्रांना कचरा आणि घाणमुक्त करण्याचे काम सुरू आहे. 25 ते 31 ऑगस्ट या कालावधीदरम्यान विशेष स्वच्छता मोहिम सप्ताहात राबवण्यात आला आहे. कल्याण विभागामधील अ प्रभागात आंबिवली रेल्वे ब्रिज ते लहूजीनगर ते आंबिवली रेल्वे स्टेशन, ब प्रभागात खडकपाडा सर्कल ते माधव सृष्टी, क प्रभागात दुर्गाडी गणेशघाट ते वाडेघर सर्कल, जे प्रभागात काटेमानिवली ब्रिज ते विठ्ठलवाडी स्टेशन, ड प्रभागात विठ्ठलवाडी स्टेशन ते श्रीराम टॉकीज, चिंचपाडा रोड ते 90 फुटी रोड, आय प्रभागात देशमुख होम्स ते मानपाडा पोलिस ठाणे, ह प्रभागात पं. दिनदयाळ रोड, ग प्रभागात आर. पी. रोड ते दत्तनगर, फ प्रभागात बंदिश चौक ते 90 फुटी रोड व ई प्रभागात मानपाडा रोड ते शिळफाटा रोड या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेमध्ये जवळपास 1400 ते 1500 कर्मचारी, जेसीबी, डंपर, आरसी गाड्या, घंटागाड्यांच्या साह्याने स्वच्छता करण्यात आली. शिवाय मल्टीजेट जंतुनाशक फवारणी मशीन, धुरावणी मशीनच्याद्वारे जंतनाशक धुरावणी-फवारणी करण्यात आली. कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाटावरील चंदामाता सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी माहिमेत सहभाग घेतला होता. या विशेष मोहिमेकरिता महापालिका क्षेत्रातील सर्व रहिवाश्यांनीदेखिल सहकार्य करावे, असे आवाहन केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे.

खड्डे भरण-डांबरीकरणालाही गती

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या अभिकरणांमार्फत शहरात ठिकठिकाणी खड्डे भरण व डांबरीकरणाच्या कामाला वेग दिला आहे. शनिवारी कल्याणच्या ब प्रभागातील टावरी पाडा, रामबाग लेन 4, बारावे रोड, भोईरवाडी, जे प्रभागातील लोकग्राम, 90 फुटी रोड, क प्रभागातील दुर्गाडी गोविंदवाडी बायपास रस्ता, नानासाहेब धर्माधिकारी रोड, या रस्त्यांवरील खड्डे भरण व डांबरीकरणाची कामे करण्यात आली. तर डोंबिवलीत गरीबाचा वाडा रोड, जोंधळे हायस्कूल रोड, मंजूनाथ शाळेसमोरील रस्ता, जैन मंदिर रोड, दत्तनगर, नांदिवली रोड, नेरूरकर रोड, टिळक रोड, टिळक चौक, लोढा कासाबेला गणेश घाट रोड, रेतीबंदर रोडवरील खड्डे डांबरीकरणाने भरण्यात आले. ई व आय प्रभागातही खडीकरणाने रस्ते दुरूस्ती करण्यात आली. तर पालिकेच्या इतर परिसरातही खड्डे भरण व डांबरीकरणाचे काम चालू आहे असे शहर अभियंतांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news