

डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आसनगाव ते वाशिद रेल्वे स्थानकादरम्यान एका विद्यार्थिनीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थिनी डोंबिवलीतील एका शाळेत दहाव्या इयत्तेत शिकत होती. शालांत परीक्षेच्या आधी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकीकडे विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे तिच्या माता-पित्याने आकांत केला आहे. तर दुसरीकडे या विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ही मुलगी पश्चिम डोंबिवलीच्या भोपर परिसरात राहत असल्याची माहिती तपासादरम्यान उघडकीस आली आहे. लोकलमधून पडून या मुलीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेची कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा जगताप असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. 16 वर्षीय आकांक्षा डोंबिवलीतल्या एका शाळेत दहावी इयत्तेत शिकत होती. 21 फेब्रुवारी रोजी तिचा पहिला पेपर होता. दहावीची परीक्षा सुरू होण्याआधीच तिचा मृतदेह पोलिसांना आसनगाव-वाशिंद या स्थानकांच्या दरम्यान रेल्वेच्या रूळाशेजारी आढळला.
18 फेब्रुवारी रोजी सकाळी आकांक्षा आई-वडिलांसह मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी गेली होती. संध्याकाळी हे कुटुंबीय डोंबिवलीला परतले. त्याच दरम्यान आकांक्षा अचानक गायब झाली. आई-वडिलांनी शोधाशोध करूनही ती सापडली नाही.
त्याच दिवशी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आसनगाव-वाशिंद रेल्वे स्थानकांदरम्यान रूळाशेजारी एका मुलीचा मृतदेह आढळून आला. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठवला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. पुढे तपासादरम्यान पोलिसांना आकांक्षाची ओळख पटली. आकांक्षाचा मृतदेह तिच्या पालकांच्या हवाली करण्यात आला. आकांक्षाचा मृतदेह ती राहत असलेल्या कोपर परिसरातील घरी आणण्यात आला. मुलीचा मृतदेह पाहून तिच्या माता-पित्याने हंबरडा फोडला.
18 फेब्रुवारी रोजी प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी आई-वडिलांसह आकांक्षा लोकलने डोंबिवली स्थानकात उरतली. मात्र त्यानंतर तिने डोंबिवलीतून आसनगावकडे जाणारी लोकल पकडली आणि ती आसनगावच्या दिशेने निघाली. प्रवासा दरम्यान लोकलमधून पडून तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. आकांक्षाचे आसनगावला काय काम होते ? ती आसनगावकडे जाणाऱ्या लोकलमध्ये का बसली ? तिचा अपघात झाला की घातपात ? या संदर्भात लोहमार्ग पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिला आहे.
कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील तानशेत-खर्डी स्थानकांदरम्यान शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास एका तरूणीचा मृतदेह आढळल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांना मिळाली. या मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास गरजे घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करत असताना अचानक दोन्ही बाजूंनी आलेल्या लोकलचा अंदाज न आल्याने त्यातील एका लोकलची धडक बसून सपोनि गरजे जबर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी गरजे यांना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली.