

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा कल्याणहून दादरच्या दिशेने प्रवास करत असताना मुंब्र्यातील एका माथेफिरू तरूणाने त्याच्याकडील चाकूने प्रवाशांवर हल्ला केला. लोकलमधील गर्दीत धक्का लागण्याच्या वादातून ही घटना घडली. माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात तीन प्रवासी जखमी झाले. या प्रकाराने संतप्त झालेल्या प्रवाशांनी या हल्लेखोराला यथेच्छ बदडून रेल्वे सुरक्षा बलाच्या स्वाधीन केले दिले. हल्लेखोराच्या विरोधात जखमी प्रवाशांनी दिलेल्या तक्रारीवरून डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख झिया हुसेन (19) असे हल्लेखोराचे नाव आहे. तर अक्षय वाघ, हेमंत कांकरिया, राजेश चांगलानी अशी चाकू हल्ल्यात जखमी प्रवाशांची नावे आहेत. डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी माहिती देताना सांगितले की, कल्याण रेल्वे स्थानकातून बुधवारी सकाळी 9.47 वाजता निघालेली कल्याण-दादर जलद लोकल धावत होती. या लोकलमध्ये मुंब्र्यात राहणारा शेख हुसेन हा देखिल प्रवास करत होता. लोकलमध्ये तुडुंब गर्दी होती. शेख हा मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरायचे असल्याचे सांगत होता. शेखने लोकल सुरू झाल्यावर लोकलमधून उतरण्याचे प्रयत्न केला. लोकल मुंब्रा येथे थांबणार नाही. तू शांत एकाच जागेवर उभे रहा, असा सल्ला दिला. तरीही शेख दरवाजात जाण्यासाठी चुळबुळ करत होता. त्याचे धक्के इतर प्रवाशांना बसत होते. धक्का लागणाऱ्या प्रवाशांनी शेखला जाब विचारला. शेखने त्यांच्याशी भांडण उकरून काढल्यावर प्रवाशांनी त्याला चोप दिला. मारहाण होताच संतप्त झालेल्या शेखने त्याच्याकडील धारदार चाकूने मारहाण करणाऱ्या प्रवाशांवर हल्ला केला. इतर प्रवाशांनी शेखला रोखण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत प्रवासी अक्षय, हेमंत आणि राजेश या चाकू हल्ल्यात जखमी झाले.
प्रवाशांनी कौशल्याने शेख जवळील चाकू ताब्यात घेऊन त्याला पकडून ठेवले. कल्याण लोकल ठाण्यात पोहोचताच तेथे तैनात असलेल्या सुरक्षा बलाच्या जवानांनी शेखला ताब्यात घेतले. त्याला डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात दिले.