

डोंबिवली शहर : हो हो हो! सांताक्लॉजच्या हसण्याइतकीच झगमगती आणि रंगीबेरंगी झालेली कल्याण आणि डोंबिवलीतील बाजारपेठ सध्या नाताळाच्या उत्सवात न्हालेली आहे. ‘मेरी ख्रिसमस’ शुभेच्छा, झिलमिलत्या विद्युत माळा, चमचमणारे तारे, जिंगल बेल्स, आकाशकंदील, आकर्षक ख्रिसमस ट्री आणि सांताक्लॉजची खेळणी नाताळ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ ख्रिसमस स्पेशल साहित्याने अक्षरशः फुलून गेली आहे.
प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मोत्सवाच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले असून गुरुवारी शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना, कार्यक्रम आणि येशू जन्माचे देखावे सादर होणार आहेत. नाताळ जवळ येताच घरांची रंगरंगोटी, रोषणाई आणि सजावटीसाठी नागरिकांची लगबग वाढली असून बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे. यंदा लहान मुलांसाठी खास ख्रिसमस भेट, सांताक्लॉजचे कपडे, टोपी, चॉकलेट्स यांना विशेष मागणी आहे.
घरात व अंगणात मांडण्यासाठी विविध आकारांचे ख्रिसमस ट्री, आकर्षक जिंगल बेल्स, रंगीबेरंगी मेणबत्त्या, सजावटीच्या वस्तूंना ग्राहकांची पसंती मिळतेय. विशेष म्हणजे ‘रेडिमेड डेकोर’ खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक वाढल्याचे विक्रेते सांगतात. ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी अनेक दुकानांबाहेर मोठे सांताक्लॉजचे पुतळे उभारण्यात आले असून झगमगत्या रोषणाईमुळे बाजारपेठ अधिकच खुलून दिसत आहे.
सांताक्लॉज खरंच आपल्याला गिफ्ट देणार का, या कुतूहलाने त्याच्याकडे टक लावून पाहणारे चिमुकले ही नाताळपूर्व बाजारपेठेची जिवंत ओळख ठरत आहेत. दरम्यान, शहरातील चर्चमध्ये येशू जन्माच्या देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शाळांमध्येही विद्यार्थी ख्रिसमस कार्यक्रमांसाठी उत्साहात तयारी करत असून, यंदा मुलांमध्ये तसेच तरुणाईमध्ये नाताळाचा उत्साह मागील वर्षांच्या तुलनेत अधिक वाढलेला दिसून येतोय.
आकर्षक सांताक्लॉज, बाजारपेठेत उत्साहाचा शिडकावा
नाताळच्या खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी दुकानांसमोर मोठ्या आकारांचे सांताक्लॉज मांडण्यात आले आहेत. तर दुकानाबाहेर विविध आकारांचे झगमगते चांदण्या लटकवण्यात आल्याने संपूर्ण बाजारपेठ नाताळी रंगात न्हाल्याचे चित्र दिसून येते. बाजारात लहान मुलांसाठी सांताक्लॉजची आकर्षक खेळणी, रंगीबेरंगी शोभेच्या वस्तू, स्टार, विद्युत माळा, गिफ्ट्स आणि सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, हे ख्रिसमस स्पेशल साहित्य ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. परिणामी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे.
नाताळसाठी येशू ख्रिस्त जन्माची झोपडी तयार करण्याचं काम मी अनेक वर्षांपासून करत आहे. या झोपडीवर येशू ख्रिस्ताच्या जन्माची मांडणी करून ख्रिश्चन बांधव पूजा करतात. यंदा चांदण्याची मागणी अधिक आहे. झोपडीची किंमत 200 ते 1000 रुपयांपर्यंत असून, चांदण्या 500 रुपयांपासून उपलब्ध आहेत. आम्ही वर्षानुवर्षे इथे हा व्यवसाय करत आहोत.
लक्ष्मी सूर्यवंशी, कल्याण, विक्रेता
नाताळ जवळ आल्याने बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढलेली आहे. झोपड्या, विद्युत माळा, चांदण्या आणि घंटा खरेदीसाठी विशेष मागणी आहे. पण यंदा किमती वाढल्या आहेत. तरीही ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे.
रवी देशमुख, डोंबिवली, विक्रेते