

अनिलराज रोकडे
प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्रायलमधील बेथलेहेम या गावात झाला. त्या काळी जगात अन्याय, द्वेष, आणि लोभ वाढला होता. प्रभू येशूने मानवजातीला प्रेम, क्षमा आणि शांततेचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीवर आधारित ख्रिस्ती धर्माची स्थापना झाली. त्यांचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाल्याने त्या दिवसाला ‘नाताळ’ म्हणून साजरा केले जाते. जगभरात नाताळ आनंद, प्रेम आणि दयाळूपणाचा संदेश देत हा सण साजरा केला जातो. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिवसाचा उत्सव. परंतु नाताळ केवळ ख्रिस्ती लोकांचाच सण नसून तो सर्व धर्मीय लोकांमध्ये मैत्री, प्रेम, माणुसकीचा सण म्हणून ओळखला जातो.
डिसेंबर महिना आला की, सगळीकडे ख्रिस्तमस ट्री दिसू लागतात, दुकानात काचेच्या कपाटातले केक्स लक्ष वेधून घेतात, तर कानावर जिंगल बेलची धून ऐकू आली की समजावं ख्रिसमसची जादू हवेत पसरली आहे. ख्रिसमस, म्हणजेच नाताळ, हा जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः ख्रिश्चन धर्मीयांसाठी हा सर्वात महत्वाचा सण आहे. ख्रिसमस ट्री हे या सणाचे एक महत्वाचे प्रतीक आहे. ख्रिसमसच्या काळात घरोघरी ख्रिसमस ट्री उभारले जातात आणि त्याला आकर्षकपणे सजवले जाते. ख्रिसमस ट्री हे एक सूचिपर्णी झाड असते ज्याला दिवे, रंगीबेरंगी वस्तू, चांदण्या आणि इतर सजावटीच्या वस्तूंनी सजवले जाते. ख्रिसमस ट्री शाश्वत जीवन आणि आशावादाचे प्रतीक मानले जाते.
लाल कपडे घालणारा आणि सर्व लहान मुलांना भेटवस्तू वाटत फिरणारा सांताक्लॉज हे ख्रिसमसचे प्रमुख आकर्षण आहे. सांताक्लॉज म्हणजेच संत निकोलस चौथ्या शतकात तुर्की येथे बिशप होते. ते त्यांच्या दानशूर स्वभावासाठी आणि गरीब व गरजूंना मदत करण्यासाठी प्रसिद्ध होते. संत निकोलसच्या मृत्यूनंतर, त्यांची आठवण म्हणून त्यांच्या नावाने दानधर्म करण्याची परंपरा सुरू झाली. कालांतराने, संत निकोलसची कथा सांताक्लॉजच्या रूपात विकसित झाली.सांता क्लॉज रात्री घरोघरी जाऊन लहान मुलांसाठी भेटवस्तू ठेवतात, अशी मान्यता आहे. ते लाल रंगाचा पोशाख, पांढरी दाढी आणि काळे बूट घालतात. त्यांच्या हातात एक मोठी थैली असते, ज्यात मुलांसाठी खेळणी आणि इतर भेटवस्तू असतात.
ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये विशेष मिस्सा आयोजित केली जाते, ज्याला ख्रिसमस मिस्सा किंवा मध्यरात्रीची मिस्सा असेही म्हणतात. ही मिस्सा साधारणतः 24 डिसेंबरच्या रात्री किंवा 25 डिसेंबरच्या पहाटे आयोजित केली जाते. मिस्सामध्ये प्रार्थना, बायबलचे वाचन, गायनचा समावेश असतो. या मिस्सा व्यतिरिक्त अनेक कानांना गोड वाटणारी ख्रिसमसची गाणी गायली जातात त्याला आपण ख्रिसमस कॅरॉल्स म्हणून ओळखतो. ख्रिसमस कॅरॉल्स ही ख्रिसमसची खास गाणी आहेत, जी चर्चमध्ये, घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी गायली जातात. ही गाणी येशू ख्रिस्ताच्या जन्माची कथा आणि ख्रिसमसचा संदेश सांगतात. अनेक संगीतकार ख्रिसमससाठी खास अल्बम तयार करतात, ज्यात पारंपरिक आणि नवीन गाण्यांचा समावेश असतो.
कुठलाही सण हा खाद्यपदार्थांशिवाय अपूर्ण आहे आणि त्यातही ख्रिसमस म्हटलं की केक आणि इतर गोड पदार्थांची आठवण येतेच. जगभरात ख्रिसमसच्या निमित्ताने विविध प्रकारचे केक आणि पदार्थ बनवले जातात, ज्यांची स्वतःची अशी वेगळी चव आणि परंपरा आहे. प्लम केक, फ्रुट केक, जिंजरब्रेड केक, यूल लॉग, कुकीज, शुगर कुकीज, शॉर्टब्रेड, कँडी केन, एगनॉग, स्टॉलन असे अनेक खाद्यपदार्थ केले जातात. आदिवासी आणि खेड्या पाड्यांमधील ख्रिस्ती बांधव थोड्या वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करतात.
तांदुळाच्या रव्या पासून बनविलेली केक व केळी या गोष्टींचा समावेश त्यांच्या जेवणाचा एक महत्वपूर्ण भाग असतो. तर, दक्षिण भारताच्या काही भागात पायसम हा गोड पदार्थ बनवून हा दिवस साजरा केला जातो. परंपरावादी ख्रिश्चन लोकांसाठी हा सण प्रार्थना आणि आत्मशुद्धीचे कारण असतो. म्हणून, रोमन कॅथोलिक्स संप्रदायाचे लोक 1 डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत फक्त शाकाहारी भोजनाचे सेवन करतात. ख्रिसमसला हसू, प्रेम आणि आनंद घेत ख्रिसमसच्या शुभेच्छा !