

ठाणे : अनुपमा गुंडे
मुलं दत्तक घेण्यासाठी लागणारी साडे तीन वर्षांची प्रक्रिया, कायदेशीर रित्या मुले दत्तक देण्यासाठी होणारी कायदेशीर प्रक्रियेस लागणारा विलंब यामुळे राज्यातील दत्तक विधान केंद्राकडे सुमारे 2 हजार 156 पालक मुल दत्तक मिळण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. या केंद्राकडून दत्तक घेणार्या पालकांचा मुलींना दत्तक घेण्याकडे कल आधिक असल्याचे आकडेवारीवरून सिध्द होते. (केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण / Central Adoption Resource Authority - CARA)
राज्यातील दत्तक देणार्या संस्थांमध्ये दाखल असलेली मुले - 1079
त्यातील दत्तक जाऊ शकणारी मुले - 547
प्रतीक्षा यादीत असलेले पालक - 2,156
मुलांना दत्तक देण्याच्या प्रक्रियेसाठी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) कार्यरत आहे. या प्राधिकरणातंर्गत देशभर शिशुगृह किंवा सामाजिक संस्थांमार्फत दत्तक प्रक्रिया पार पाडली जाते. महाराष्ट्रात अशा 36 संस्था कार्यरत आहेत. राज्यातील या संस्थांमध्ये अनाथ, पोलिसांमार्फत, पालकांनी सोडून दिलेली मुले दाखल होतात.
केंद्र सरकारच्या केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणच्या संकेतस्थळावर मुलांच्या दत्तक जाणारे मुलांचे प्रमाणात मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारी दिसून येते.
देशात 2020-21 मध्ये देशातंर्गत 3142, 2021-22 मध्ये 2991, 2022-23 मध्ये 3010 मुले दत्तक गेली आहेत. तर या तीन वर्षात परदेशात अनुक्रमे 417, 414 आणि 431 मुले दत्तक गेली आहेत. 2022-23 या वर्षात देशात सुमारे 3010 मुले दत्तक गेली आहेत, त्यात 1286 मुले तर 1724 मुलांचा समावेश होता. याच वर्षात परदेशात 431 मुले दत्तक गेली त्यात 187 मुले तर 244 असे मुलांचे प्रमाण होते.
एक मुल दत्तक जाण्याच्या प्रक्रियेत साडेतीन वर्षांचा कालावधी - दत्तक प्रक्रियेसाठी काराच्या संकेतस्थळावर नावनोंदणी केल्यानंतर पालकांना लगेच मुल दत्तक हवे असते, मात्र शासनाने दिलेल्या प्रक्रियेनुसार काम करतांना एक मुल दत्तक जाण्याच्या प्रक्रियेत साडे तीन वर्षांचा कालावधी लागतो. या प्रक्रियेसाठी संबंधित संस्था मुल दत्तक घेवू इच्छिणार्या पालकांची कायदेशीर प्रक्रियेनुसार आवश्यक असलेली माहिती संकलित करते, त्याचा अहवाल करते, त्या प्रक्रियेला लागलेल्या कालावधीनंतरही त्या पालकाची मुल दत्तक घेण्याची इच्छा कायम आहे का, याचीही तपासणी करूनच मुल दत्तक दिले जाते. देशात आणि देशाबाहेर दत्तक जाणार्या मुलांमध्ये मुलींना दत्तक घेण्याकडे 60 टक्के पालकांचा कल असतो. ज्या पालकांना दोन मुलेच आहेत, असे पालक मुली दत्तक घेतात, तसेच अनेक पालकांची मानसिकता ही मुली दत्तक घेण्याकडेच कल आहे. कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या मुले व्यवस्थेतील त्रुटी किंवा विलंबामुळे दत्तक प्रक्रियेसाठी लागलीच मुक्त (लिगली फ्री) होत नाहीत त्यामुळे दत्तक प्रक्रियेला लागणार्या विलंबामुळे काराच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये पालकांची प्रतीक्षा यादी दिसून येते.
अतुलचंद्र बिऱ्हाडे, अधीक्षक, शिशुगृह दत्तक संस्था, धुळे
केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) किंवा मान्यताप्राप्त दत्तक संस्थेकडे ऑनलाइन अर्ज करून नोंदणी करावी लागते. नोंदणी नंतर संबंधित संस्था दत्तक घेणार्या पालकांच्या घराची आणि कुटुंबाची तपासणी करते.
यात संबंधित पालकांच्या कुटुंबाची सामाजिक आणि आर्थिकस्थिती बरोबर शारीरिक आणि मानसिक स्थितीही लक्षात घेतली जाते. पालकांचे समुपदेशन केले जाते. संबंधित संस्था या सर्व बाबींचा अहवाल तयार करते.
या सर्व प्रक्रियेला लागणार्या कालावधीनंतर संबंधित पालकांची मुले दत्तक घेण्याची इच्छा पुन्हा मुलाखतीद्वारे तपासली जाते. त्यानंतर पालकांना मुलांची निवड करता येते. मुलाच्या आरोग्याच्या आणि सामाजिक स्थितीची माहिती दिली जाईल.