Sanjay Gandhi National Park firing case: पोलिसांनी स्मशानातील चितेची राख उकरली

चेना शिकार व हत्या प्रकरण; मेटल डिटेक्टरच्या मदतीने दोन छरे व अर्धवट जळालेला मोबाईल जप्त
Police
PolicePudhari
Published on: 
Updated on: 

मिरा रोड: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील चेना परिसरात शिकारीदरम्यान झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी गुपचूप अंत्यसंस्कार उरकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या गुन्ह्याची पाळेमुळे खणून काढताना काशिगाव पोलिसांच्या तपासाला मोठे यश आले असून, बॉम्बशोधक व निकामी पथकाने स्मशानभूमीतील चितेची राख तपासली असता त्यात दोन धातूचे छरे आणि अर्धवट जळालेला मोबाईल मिळून आला आहे.

या धक्कादायक शोधामुळे संपूर्ण प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना २४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे. या गुन्ह्यातील व्हॉट्सॲपवर मृत्यू दाखला देणारे डॉ. पालांडे अद्याप मोकाट असल्याने त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.

Police
Vasai Virar Water Cut: पावसाळा संपताच वसई-विरारवर पाणीकपातीचे संकट! १० टक्के कपातीचा प्रस्ताव; निर्णय आठ दिवसांनंतर

मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी रात्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चेना येथील डेबुचा घाट परिसरात आरोपींची टोळी बेकायदेशीर शिकारीसाठी गेली होती. अंधारात मोबाईलचा प्रकाश दिसल्याने वन्यप्राण्याचे डोळे चमकत असल्याचा गैरसमज आरोपी महेश गायकर याने केला आणि थेट गोळीबार केला.

या गोळीबारात विजय सापटे (वय ६०) यांच्या छातीत व पायात छरे घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. घटनेचे गांभीर्य लपवण्यासाठी व कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आरोपींनी पोलिसांना कोणतीही माहिती न देता मृतदेहावर घाईघाईत गुपचूप अंत्यसंस्कार केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे डाग असलेली पाने, दगड, चप्पल, छऱ्यांची बंदूक आणि रायफलचा भाग जप्त केला.

Police
Vasai Virar Water Cut: पावसाळा संपताच वसई-विरारवर पाणीकपातीचे संकट! १० टक्के कपातीचा प्रस्ताव; निर्णय आठ दिवसांनंतर

तसेच मृताच्या घरातूनही रक्ताने माखलेले साहित्य ताब्यात घेण्यात आले. पुरावे नष्ट करण्यासाठी अंत्यसंस्कार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी चक्क स्मशानभूमी गाठली. बॉम्बशोधक व निकामी पथकाच्या मदतीने चितेच्या राखेची मेटल डिटेक्टरद्वारे सखोल तपासणी करण्यात आली.

या तपासणीत राखेमधून धातूचे दोन छरे, एक अर्धवट जळालेला मोबाईल आणि जळालेल्या अवस्थेतील सिमकार्ड हस्तगत करण्यात आले. जप्त करण्यात आलेला मोबाईल मृताचा आहे की आरोपींपैकी कोणाचा, हे फॉरेन्सिक तपासणीनंतर समोर येणार आहे.

या प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात महेश अनंत गायकर (वय ५२), रोहित सापटे, कल्पेश डगला, कुणाल शेलार, काठोड लाबड (वय ५५), प्रवीण जाधव आणि डॉ. राजेश पालांडे यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत महेश गायकर आणि काठोड लाबड या दोघांना बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

डॉ. पालांडे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी

आरोपी डॉ. राजेश पालांडे यांनी प्रत्यक्षात तपासणी न करता केवळ व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर मृतदेह पाहून मृत्यू प्रमाणपत्र दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप आहे. डॉ. पालांडे यांना पोलिसांनी केवळ नोटीस बजावली असली, तरी त्यांच्यावर अद्याप कोणतीही कठोर कारवाई न झाल्याने ते मोकाट फिरत असल्याचा आरोप होत आहे.

एका संशयास्पद मृत्यूचे प्रमाणपत्र अशा प्रकारे देणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात असून डॉ. पालांडे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. चितेच्या राखेतील पुरावे आणि फॉरेन्सिक अहवालातून या हत्याकांडात आणखी कोणकोणते मोठे खुलासे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news