

Cable-stayed bridge to be constructed between Tavasal and Jaigad
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
गेली चाळीस वर्ष रखडलेला कोकणचा सागरी महामार्ग आता पूरर्णत्वाला जाण्याच्या मार्गावर असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर ७१५ कोटींचा भव्य 'केबलस्टेड' पूल उभारण्यात येणार आहे.
गुहागर तालुक्यातील तवसाळ ते रत्नागिरी तालुक्यातील जयगड हे सागरी अंतर पार करणे, या पुलामुळे सहजशक्य होणार आहे.
मुंबईतील वरळी सिलींक प्रमाणे या जयगड खाडीवरील केबलस्टेड पुलामुळे येथील समुद्री महामार्गाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रेवस ते रेड्डी असा ४९८ किलोमीटर लांबीचा समुद्री महामार्गाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या समुद्री महामार्गामुळे रायगडच्या किनारपट्टीचा भाग तसेच पुढे रत्नागिरी तालुक्यातील काही महत्वाच्या खाड्या आणि पुढे सिंधुदुर्ग जिह्यातील रेड्डी गाव अशा हा सागरी महामार्गासाठी ७ हजार ८५१ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या सागरी महामार्गावर रेवस, धरमतर, कुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड आणि कुणकेश्वर असे ७ पूल उभारण्यात येणार आहेत. जयगड खाडीचे मनोहारी दृष्य न्याहाळता येणार आहे.
यापैकी रत्नागिरी तालुक्यातील जयगड खाडीवर ७१५ कोटींचा 'केबलस्टेड' पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाची लांबी २.०९ किलोमीटर इतकी असून रुंदी १८ मीटर असणार आहे.
या सागरी महामार्गावर रेवस, आगार दंड हरिहरेश्वर, दाभोळ, जयगड ही सागरी स्थळे अद्याप बाकी आहेत. या पुलांची सुद्धा निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गाचे काम पुढील दोन वर्षात पूर्ण होईल, असे रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले.
या पुलाची उंची भरती रेषेच्या वरती ४० मीटर असणार आहे. तर या पुलासाठी उभारण्यात येणाऱ्या दोन पिलरमधील अंतर १०० मीटर इतके असणार आहे. यामुळे मोठी जहाज तसेच प्रवासी जहाजांना ये-जा करणे सहजशक्य होणार आहे. या पुलावर करण्यात येणारी विद्युत रोषणाई तसेच पर्यटकांसाठी, प्रवाशांसाठी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पादचारी रस्त्यामुळे येथील पर्यटनात भर पडणार असल्याचे महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले.