

डोंबिवली : मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकाला कामावरून टाकल्याने त्याचा राग मनात धरून चालकाने आपल्या शालेय बसच्या मालकावर चाकूने सपासप वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रविवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास डोंबिवली जवळच्या नांदिवली परिसरात घडला. मालकावर जीवघेणा हल्ला करून मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी माथेफिरू हल्लेखोराला कल्याण स्थानकातून जेरबंद केले. सुदाम जाधव असे जखमी मालकाचे नाव असून त्यांच्यावर एमआयडीसीच्या निवासी विभागातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हल्लेखोर चालकाला पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपशहरप्रमुख असलेल्या सुदाम जाधव यांचा शालेय बस चालविण्याचा व्यवसाय आहे. शिवाय ते जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. या संस्थेशी जोडलेल्या सदस्य वजा बस चालकांचे नेतृत्व करणारे सुदाम जाधव यांच्या बसवर मजोज नाटेकर हा गेल्या २० वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत होता. दरम्यान मनोजला दारूचे व्यसन जडल्याने तो कामावर हजर होत नसे. शिवाय त्याच्याकडे असलेल्या वाहन चालविण्याच्या परवान्याचे नुतनीकरण देखील केले नव्हते. त्यातच शाळांनी वाहन चालविण्याचा परवाना असणाऱ्या चालकांनाच बसवर नेमण्याची सक्ती केली होती. त्यामुळे सुदाम जाधव यांनी त्यांच्या बसवर नेमलेला चालक मनोज नाटेकर याला जून महिन्यात कामावरून काढून टाकले होते. तो राग मनोजच्या मनात सलत होता.
मालकाला संपविण्याच्या संधीची वाट पाहत असतानाच रविवारी दुपारच्या सुमारास हल्लेखोर मनोज हा नांदिवली नाक्याजवळ असलेल्या एका हॉटेल बाहेर दबा धरून बसला होता. सदर हॉटेलमध्ये दोघा मित्रांसह जेवण करून सुदाम जाधव बाहेर पडल्यानंतर अचानक मनोज नाटेकर याने कमरेला खोचलेला धारदार चाकू काढून हल्ला केला. छातीवर सपासप वार केला. सुदाम यांनीही प्रतिकार करत त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हा सारा प्रकार तेथे उपस्थित आलेल्या एका बघ्याने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर हल्लेखोराने तेथून पळ काढला. पोलिसांनी त्याला कल्याण स्थानकात सापळा लावून अटक केली असून त्याच्याकडील चाकू जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात जखमी सुदाम जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.