

ठाणे : राज्यात बुद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणी- पक्षी गणनेत विविध अभयारण्यात विविध गणनेत 100 प्रजाती आढळल्याची नोंद आहे. पश्चिम घाटात महाराष्ट्रात 105 ठिकाणी, केरळात 14 ठिकाणी, कर्नाटकात 17 ठिकाणी, गोव्यात 3 ठिकाणी तर गुजरातमध्ये 5 ठिकाणी सर्वेक्षण झाले. महाराष्ट्रात सापडलेल्या 100 प्रजातींपैकी 12 वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आहेत. तर केरळमध्ये सापडलेल्या 43 प्रजातींपैकी 33 वैशिष्ट्यपूर्ण होत्या. कर्नाटकांत 64 पैकी 6 वैशिष्ट्यपूर्ण होत्या. गोव्यात 35 पैकी 4 वैशिष्ट्यूपर्ण प्रजाती आहेत.
पश्चिम घाटात कीटकांच्या विविध प्रजातींचे सर्वेक्षण करण्यात आले. यात 35 टक्के कीटकांमध्ये घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. नैसर्गिक अधिवासांचा झालेला ऱ्हास यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. मात्र त्यात 71 वैशिष्टयपूर्ण प्रजाती आढळल्याचे सकारात्मक निष्कर्षही मांडण्यात आले आहेत. हे सर्वेक्षण एमआयटी विश्वशांती केंद्राच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. 2021 ते 2025 दरम्यान हे सर्वेक्षण झाले आहे.
यामध्ये चतुर व टाचणी प्रजातीचे मॅपिंग करण्यात आले. पश्चिम घाटात 44 ठिकाणी याबाबतचे सर्वेक्षण करण्यात आले. कीटकांच्या प्रजाती या पर्यावरण संतुलनात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या प्रजातींचे संवर्धन महत्वाचे असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. प. घाटातील नद्या, ओढे, धबधबे तलाव, सरोवरे, धरणे यासारख्या गोड्या पाण्याच्या जलाशयाजवळ या कीटकांचे अधिवास असतात. या सर्वेक्षणात 143 जातींच्या कीटकांच्या प्रजातींची नोंद झाली असून त्यातील 40 टक्के प्रजाती वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
पर्यावरण बदलामध्ये तग धरू शकणारे कीटक पुनरुत्पादन करतात. पर्यावरणीय आरोग्य व जलस्त्रोतांचे शुद्धीकरण या दोन्ही गोष्टीमध्ये कीटक प्रजातींचे अस्तित्व महत्वाचे असते, अशी भूमिका पर्यावरणीय संशोधकांनी मांडली आहे. दक्षिण ते उत्तर असे प. घाटाचे सर्वेक्षण पुढील पर्यावरणीय बदलांमध्ये महत्वपूर्ण ठरणारे आहे. बुद्ध पौर्र्णिमे दरम्यान गेल्या 5 वर्षात विविध ठिकाणी झालेल्या सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष आहेत. यातून कीटकांच्या एकूण अधिवासाचाही अभ्यास पुढे आला आहे.
समुद्री जीवांचाही अभ्यास
दुसऱ्या एका संशोधनात समुद्री जीवांचा अभ्यास करण्यात आला आहे. पश्चिम किनाऱ्यावरील ऑलीव्ह रिडले कासवे ही हजारो किलोमीटरचा प्रवास करत असून या कासवांच्या सॅटेलाईट टॅगिंग मधून समुद्री जीवांचाही साहसी प्रवास पुढे आला आहे. तीन महिन्यात 1800 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या कासवाने अरबी समुद्राच्या तळाशी 380 मीटर खोलीचा प्रवासही केल्याची नोंद झाली आहे. कोकण किनारपट्टीवर कासव संवर्धनाचे काम गेली 25 वर्षे सुरू असून जखमी कासवांना उपचार करून समुद्रात सोडल्यानंतर त्यांचा समुद्र तळाचा प्रवास पुढे आला आहे.