

बोईसर : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकाचा पासवर्ड पाहून हातचलाखीने त्याचे एटीएम कार्ड बदलत खात्यातून ३३ हजार रुपये लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ३३ हजार रुपयांची रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
मोहम्मद काशिम अब्दुलकादर बावला हे २८ सप्टेंबर रोजी मान रोड परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी ते एटीएममध्ये पासवर्ड टाकत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांचा पासवर्ड पाहिला. त्यानंतर हातचलाखीने फिर्यादीचे एटीएम कार्ड बदलून घेतल्याचा आरोप आहे. फिर्यादी घरी गेल्यानंतर त्यांच्या एसबीआय खात्यातून ३३ हजार रुपये काढण्यात आले.
या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कृष्ण शिवनारायण तिवारी (२७) याला ११ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडून फसवणुकीची संपूर्ण रक्कम आणि दुचाकी जप्त करण्यात आली. तपासात आरोपीचा बोईसर पोलीस ठाण्यातील दोन जुन्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, तुळींज, काशीमीरा व नारपोली पोलीस ठाण्यांतही त्याच्याविरुद्ध एकूण सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे व उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील जाधव व पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ऋषीकेश मुठे करीत आहेत.