कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाडांच्या पत्नीला भाजपकडून उमेदवारी
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Polls) भाजपने पहिल्या यादीत कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या पत्नी सुलभा गायकवाड (Sulabha Gaikwad) यांना उमेदवारी दिली आहे. भाजपसह मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महायुतीच्या इच्छुक उमेदवारांचे दावे आता बेदखल झाले आहेत. मात्र दुसरीकडे काही दिवसांपूर्वी बंडाचे निशाण फडकावण्याच्या इशारा देणारे शिंदे सेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेणार का ? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
तुरूंगात असलेल्या आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) आणि महेश गायकवाड यांच्यात संघर्ष सुरू आहे. आमदार गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचा इशारा महेश गायकवाड यांनी दिला होता.
गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात वैमनस्य
गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात वैमनस्य आहे. द्वारलीतील जमिनीच्या वादातून आमदार गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनात शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्याची घटना शुक्रवारी 2 फेब्रुवारी रोजी घडली होती. तळोजा तुरूंगात असलेल्या गणपत गायकवाड यांना या प्रकरणात अद्याप जामीन मिळालेला नाही.
सुलभा गायकवाड यांचा विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग
दरम्यान, आमदार गणपत गायकवाड तुरूंगात असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत सुलभा गायकवाड यांनी विकासकामांची भूमिपूजने केली. शिवाय पक्षाच्या बैठका, मेळाव्यांसह विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तेव्हापासूनच भाजपाकडून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर रविवारी सुलभा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.
जीवावर उठलेल्यांना सहकार्य नाही
याच मतदारसंघातून शिंदे सेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड इच्छुक उमेदवार आहेत. सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यामुळे युती धर्माचे पालन महेश गायकवाड यांना करावे लागणार आहे. मात्र, जीवावर उठलेल्या शत्रूला मदत करण्याऐवजी महेश गायकवाड यांनी पुन्हा एकदा आमदार गायकवाड यांच्या विरोधात दंड थोपटताना तिखट प्रतिक्रिया दिली. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू मानले जाणारे महेश गायकवाड अपक्ष लढणार का ? याची चर्चा रंगली आहे.
15 वर्षांत विकासकामांचा बट्ट्याबोळ
कल्याण पूर्व मतदार संघात गणपत गायकवाड हे गेल्या 15 वर्षांपासून आमदार आहेत. त्यांनी 15 वर्षात विकासकामे केली नाहीत. पूर्वेत पाणी समस्या, खड्डे, वाहतूक कोंडी, शासकीय रूग्णालयाचा अभाव, आदी कारणांमुळे या मतदारसंघातील रहिवासी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा गणपत गायकवाड यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे शहरप्रमुख गायकवाड यांनी इशारा दिला होता. (Maharashtra Assembly Polls)