पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी आज (दि. २०) जाहीर झाली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, या यादीत अकोट, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, कारंजा, वाशिम, आर्वी, नागपूर मध्य, गडचिरोली, आर्णी, नाशिक मध्य, उल्हासनगर, बोरिवली, वर्सोवा, घटकोपर पूर्व, पेण, पुणे छावणी, गेवराई, माळशिरस या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना संधी देण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.
भाजपने पहिल्या यादीत बहुतांशी ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी दिलेली आहे. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. तर पहिल्या यादीत १९ मतदारसंघातील विद्यमान आमदारांना संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासाठी काही जागांची अदलाबदल होण्य़ाची शक्यता आहे.
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, नालासोपारा येथून राजन नाईक, येरोळीमधून गणेश नाईक, बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे, पनवेलमधून प्रशांत ठाकूर, भोसरीतून महेश लांडगे, श्रीगोंदा येथून प्रतिभा पाचपूते, निलंगा येथून सभांजी पाटील निलंगेकर, तुळजापूरमधील राणा जगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
चिखली मतदार संघातून श्वेता महाले, भोकर मतदार संघातून श्रीजा चव्हाण, जिंतूरमधून मेघना बोर्डिकर, फुलंबरी येथून अनुराधाताई चव्हाण, नाशिक पश्चिम येथे सिमाताई हिरे, कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड, बेलापूर मतदानसंघातून मंदा म्हात्रे, दहिसर येथे मनिषा चौधरी, गोरेगाव येथून विद्या ठाकुर, पार्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ, शेवगावमधून मोनिका राजले, श्रीगोंडा येधून प्रतिभा पाचपुते, कैजमधून नमिता मंदुडा, या सर्व महिलांना भाजपच्या पहिल्या यादीमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे.