

विश्लेषण - शशिकांत सावंत
ठाणे ः राज्यात महापालिका निवडणुकीत कुठला ब्रँड चालणार, याची चर्चा सुरू झाली होती. मुंबईत भाजपविरुद्ध ठाकरे ब्रँड अशा अटीतटीच्या लढतीत भाजपने बाजी मारली. तर ठाणे, कल्याणमध्ये शिंदे सेना, तर नवी मुंबई, मीरा-भाईंदर, पनवेलमध्ये भाजप पुन्हा एकदा सरस ठरल्याने भाजपचा महाब्रँड कामी आल्याचे सांगितले जाऊ लागले आहे.
उल्हासनगरमध्येही भाजपने स्वबळावर लढून सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, बदलापूर, अंबरनाथ पॅटर्नप्रमाणे उल्हासनगरमध्ये शिवसेना गटबंधन बहुमत गाठेल, अशी शक्यता सुरू आहे. त्यामुळे महायुतीतील हे पक्ष सत्तेत एकत्र असले तरी मनाने दुरावल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत शिंदे सेना पिछाडीवर पडली, तर हिंदफितुरी होऊनही ठाकरेंच्या शिवसेनेने 65 जागा खेचून आणल्या. त्यामुळे सत्ता आली नसली तरी ठाकरे ब्रँडची चर्चा निवडणुकीनंतरही होताना दिसत आहे.
एकूण महापालिकांच्या निवडणुकीत कोकणात भाजपने 457 सदस्य निवडून आणले आहेत आणि नंबर एक पक्ष म्हणून निवडून आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेने 244 जागा जिंकल्या आहेत; तर ठाकरेंच्या शिवसेनेला 84 जागा मिळाल्या आहेत, तर मनसेला केवळ 14 जागा मिळाल्या आहेत. शरद पवार राष्ट्रवादीला 29, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 14 जागा, तर एमआयएमला तब्बल 24 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणणारा पक्ष भाजपच ठरला आहे.
शिवसेना विरुद्ध भाजप या लढाईत उल्हासनगर वगळता अन्य महापालिकांत शिवसेनेला भाजपपुढे नमते घ्यावे लागल्याचे चित्र आहे. एकूण कोकणातील नऊ महापालिकांपैकी मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई या तीन महापालिका शिवसेना भाजप आमनेसामने होत्या; तर मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी, पनवेल या महापालिकांत महायुती म्हणून निवडणूक लढवली.
पनवेल-नवी मुंबईत भाजप स्वबळावर सत्तेत
भिवंडी आणि वसई-विरार या दोन महापालिका महायुतीकडे येऊ शकल्या नाहीत. उर्वरित सात महापालिका मात्र महायुतीने जिंकल्या आहेत. ठाण्यात शिंदेंच्या शिवेसेनेला स्वबळावर बहुमत मिळाले आहे. कल्याण-डोंबिवलीत मात्र सेना भाजप एकत्र आली तरच सत्ता येईल. उल्हासनगरमध्ये शिवसेनेने स्वबळावर सत्तेची तयारी सुरू केली आहे.
भिवंडी निजामपूरमध्ये काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि एमआयएम या तिघांचे बहुमत आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजप स्वबळावर विजयी झाला आहे. वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची स्वबळावर सत्ता आली आहे. पनवेल व नवी मुंबईमध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आहे; तर मुंबईत शिवसेना भाजप महायुतीचे बहुमत आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकणारा भाजपचा महाब्रँड असल्याचे भाजप सांगत आहे.