

नवी मुंबई : टीटीसी औद्योगिक क्षेत्रात पावणे येथील भूखंड क्रमांक ए 37 मधील बीटाकेम या केमिकल कंपनीत शनिवारी दुपारी 12 वाजनेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.
आगीची घटना समजताच नवी मुंबई महापालिका व एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.मात्र सदर कंपनी रसायनाची असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. सदर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
पावणे एमआयडीसी भागातील बिटाकेम या केमिकल कंपनीस आग लागली होती.आगीमुळे कंपनीच्या आवारातून मोठ्या प्रमाणात काळ्या धुराचे लोट उसळून ते दूरवरपर्यंत पसरले होते. यामुळे परिसरातील कामगार आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच महापे, ऐरोली व वाशी भागातील अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सदर केमिकल कंपनी असल्याने आग अधिक पसरू नये यासाठी अग्निशमन दलाकडून विशेष खबरदारी घेत आजूबाजूच्या कंपन्यांतून कामगारांना बाहेर काढण्यात आले.त्यानंतर आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
सदर आग ही शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी खरे कारण संपूर्ण आग विझवल्यानंतर व तपासात उघड होईल.तसेच सदर आगीत कुणीही जखमी किंवा मृत झाले नाहीत, अशी माहिती एमआयडीसी अग्निशमन केंद्राचे प्रमुख अधिकारी मिलिंद ओगले यांनी दिली.