

रायगड : जागतिक बाजारपेठेत ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणच्या हापूस आंब्याचे अस्सलपण आणि हक्क अबाधित राहणार की गुजरातच्या वलसाड आंब्याला स्वतंत्र ओळख मिळणार, याचा फैसला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. चेन्नई येथील भौगोलिक मानांकन नोंदणी कार्यालयात या ऐतिहासिक वादाची सुनावणी पूर्ण झाली असून, रजिस्ट्रीने याप्रकरणी आपला निकाल राखून ठेवला आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत पिकणाऱ्या हापूस आंब्याला २०१८ मध्येच ‘भौगोलिक मानांकन’ (जीआय टॅग) बहाल करण्यात आले आहे. कोकणातील विशिष्ट हवामान, जांभ्या दगडाची जमीन आणि समुद्रकिनाऱ्यामुळे येथील हापूसला मिळणारी चव, रंग आणि सुगंध जगात अद्वितीय मानला जातो. मात्र,गुजरातच्या वलसाड भागातील आंबा उत्पादकांनी ‘वलसाड हापूस’ नावाने स्वतंत्र जीआय मानांकनासाठी अर्ज दाखल केला होता.
कोकणच्या सीमेला लागून असलेल्या या पट्ट्यातील आंब्याला हापूसचे मानांकन मिळाल्यास कोकणातील मूळ हापूसच्या बाजारपेठेवर आणि निर्यात मूल्यावर मोठा परिणाम होईल, अशी भीती कोकणातील बागायतदारांनी व्यक्त केली आहे. गुजरातच्या या दाव्याला दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्था तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील आंबा बागायतदार संघटनांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.
सुनावणीतील कोकणच्या बाजूने मांडलेले मुद्दे
कोकणातील हापूसची जनुकीय रचना, साखरेचे प्रमाण, गर आणि टिकाऊपणा हा पूर्णपणे कोकणच्या भूगोलाशी निगडित आहे. वलसाड आंब्याला हापूसचा दर्जा मिळाल्यास देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्सल कोकण हापूस आणि इतर आंब्यांमध्ये फरक करणे कठीण होईल, ज्याचा थेट फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसेल. गेल्या अनेक शतकांपासून हापूसची लागवड आणि व्यापार हा कोकण किनारपट्टीशीच जोडलेला असल्याचे ऐतिहासिक व शास्त्रीय पुरावे सादर करण्यात आले आहेत.
कोकण हापूस ३०० वर्षे, तर वलसाडचा आंबा ७० वर्षे जूना
कोकणच्या हापूस आंब्याचा इतिहास सुमारे अडीचशे ते ३०० वर्षे जुना आहे. आपल्याकडे देशी वाण होते. मात्र, पोर्तुगीजांनी (अल्फान्सो डी अल्बुकर्क) आणलेल्या कलम करण्याच्या तंत्रामुळे कोकणात हापूस बहरला. १९७२ मध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर हापूसची कलमे इतरत्र गेली आणि वलसाडसारख्या भागात गेल्या ६० ते ७० वर्षांत ही लागवड वाढली. मात्र, ‘हापूस’ हा ब्रँड केवळ कोकणचाच राहावा, यासाठी आम्ही २००८ मध्ये दापोली कृषी विद्यापीठाकडे संकल्पना मांडली. कोकणच्या ‘हापूस’ला २०१८ मध्ये एकत्रित जीआय मानांकन मिळवून दिले. कोकणचा हापूस सुरक्षित ठेवण्यासाठी हे मानांकन अत्यंत महत्त्वाचे ठरले, अशी माहिती ज्येष्ठ हापूस आंबा तज्ज्ञ व जीआय मानांकनाचे प्रणेते डॉ. विवेक भिडे यांनी दिली.