

मिरा रोड : भाईंदर येथे राहणाऱ्या इसमाला कर्जाची परतफेड करण्यासाठी मालमत्ता विक्रीचा बहाणा करून तब्बल 2 कोटी 27 लाख 94 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंकजकुमार महेश्वर राय, वय 35, रा. भाईंदर पूर्व यांची डॉ. धिरज देवीप्रसाद यादव (31) आणि डॉ. सुषमा धिरज यादव (33) यांच्याशी ओळख होती. ऑक्टोबर 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत, आरोपींनी आपल्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक फेज-3, शुभचिंतक हाईट्समधील 6 गाळे आणि 2 हॉल विक्री करण्याचा बनाव रचला.
आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना 31 लाख 94 हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरण्यास सांगितले. व्यवहारापोटी फिर्यादीकडून एकूण 1 कोटी 96 लाख रुपये स्वीकारण्यात आले.
या रकमेपैकी 1 कोटी 45 लाख रुपये आरोपींनी चोला मंडलम् बँकेत भरले. मात्र, प्रत्यक्षात व्यवहार पूर्ण न करता तसेच मालमत्तेचा ताबा न देता फिर्यादीची एकूण 2 कोटी 27 लाख 94 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
फिर्यादी पंकजकुमार राय यांच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी डॉ. धिरज यादव आणि डॉ. सुषमा यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे हे करत आहेत.