

माथेरान : माथेरान नगरपालिका हद्दीतील बेबी डिसूजा मार्गावर काही अज्ञात बांगलेधारकांनी अनधिकृतपणे रस्त्याचे काम सुरू केले आहे. त्याकडे पालिका प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष यामुळे या ठिकाणी मोठे अर्थकारण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे असून पालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधत येथे जोरदार बांधकाम सुरू असल्याने हे काम कोणाच्या सांगण्यावरून होत आहे असा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारू लागली आहे.
माथेरान हे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत असल्याने येथे कोणतेही काम करावयाचे असल्यास सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या सनियंत्रण समितीची अगोदर परवानगी घ्यावी लागते व त्यानंतरच कोणतीही कामे केली जातात.
माथेरान मध्ये अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे येथील नागरिक अनेक वर्षांपासून हे रस्ते सुस्थितीत व्हावे याकरिता नगरपालिकेशी पत्र व्यवहार करीत आहेत, परंतु परवानगीच्या नावाखाली ही कामे रेंगाळली आहेत. परंतु बेबी डिसूजा मार्गावरती खाजगी बंगलेधारकाने परवानगी विना सर्व नियम व कायद्याची पायमल्ली करताना राजरोसपणे खोदकाम व रस्त्याचे काम सुरू केले आहे.
विशेष म्हणजे वनविभागाकडूनही माती व दगड खोदकामास परवानगी नाही तरीही या ठिकाणी जोरदारपणे रस्ता बनविला जात आहे व भराव ही टाकला जात आहे त्याच प्रमाणे मोठ्याप्रमाणात सिमेंट चा वापर केला जात आहे व त्याकडे वनविभाग व पालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.