

ठाणे : भाईंदर येथील मानवी वस्तीमधून पकडण्यात आलेला बिबट्या 44 दिवसांनी येऊर वनपरिक्षेत्रातील नागला राखीव वनक्षेत्रात मृत अवस्थेत आढळून आला आहे. ही माहिती बिबट्याला लावलेला सॅटेलाईट कॉलरमधून मिळालेल्या संदेशातून वन अधिकाऱ्यांना मिळाली. या बिबट्याचे शव असलेल्या परिसराचा घटनास्थळ पंचनामा नोंदविण्यात आला असून या बिबट्याची नखे, दात व इतर महत्वाचे अवयव सुस्थितीत आढळून आले आहे. शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
वन विभागाने 19 डिसेंबर 2025 रोजी भाईंदर येथील मानवी वस्तीमधून पकडण्यात आलेल्या नर बिबट्यास वैद्यकीय तपासणीकरिता उप संचालक (दक्षिण) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांच्या अधिनस्त क्षेत्रात ठेवण्यात आले होते. पकडलेल्या बिबट्याचे मुक्ततेबाबत गठीत समितीची 22 डिसेंबररोजी बैठक होऊन त्यामध्ये चर्चेअंती समितीने बिबट्याला सॅटेलाईट कॉलर लावून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला.
त्यानुषंगाने बिबट्यास सॅटलाईट कॉलर बसवून त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर 25 डिसेंबररोजी रात्री 9.25 च्या सुमारास येऊर वनपरिक्षेत्रातील परिमंडळ नागला नियतक्षेत्र ससुनवघर सर्वे क्रमांक-58 मधील वनक्षेत्रामध्ये नैसर्गिक अधिवासामध्ये मुफ्त करण्यात आले होते. या बिबट्याला नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करते वेळी सुदृढ, चपळ असल्याचे दिसून आले तसेच त्यास बसविलेले सॅटलाईट कॉलर संनियंत्रण करण्यात येत होते.
या बिबट्याचा ससुनवघर नियतक्षेत्रामध्ये 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 पर्यंत त्याचा वावर दिसून आला होता. त्याने गुफा असलेल्या क्षेत्रामध्ये कुत्र्याची शिकार केल्याचे आढळून आले होते. 5 जानेवारी 2026 रोजी नागला ट्रेल वरती जागोजागी पायाने उकरलेले तसेच त्याची विष्ठा आढळून आली होती. अशी माहिती सॅटलाईट कॉलर मधील संदेशातून मिळाली असून हा बिबट्या शारिरीकदृष्ट्या सुदृढ असल्याचे कॅमेरा ट्रपमध्ये दिसून आला होता.
परंतू 2 फेब्रुवारीरोजी, संध्याकाळी या बिबट्याला लावलेला सॅटलाईट कॉलरचा मॉनिटर सिग्नल आल्याने येऊर वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र नागला राखीव वन सर्वे क्रमांक-73, वनखंड क्रमांक- 1118 मध्ये तात्काळ वन अधिकारी, कर्मचारी तसेच डब्ल्यूसीएस इंडियाचे निकेत सुर्वे व टीम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, हा बिबट्या मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले आहे. या बिबट्याचे शव असलेल्या परिसराचा पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा नोंदविला. या बिबट्याची नखे, दात व इतर महत्वाचे अवयव सुस्थितीत आढळून आले आहे. नैसर्गिक उजेड कमी झाल्याने या बिबट्याचे शव विच्छेदन करणे शक्य झाले नाही.
शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
पशु वैधकीय डॉ. निखिल बांगर आणि डॉ.प्रशांत गाढवे यांनी 3 फेब्रुवारीला शवविच्छेन प्रक्रिया केली असून, नमुने वैद्यकीय व तांत्रिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचा कारणाबाबत निष्कर्ष काढता येईल. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून शवविच्छेन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल आणि पुढील कारवाई मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ.जितेंद्र रामगावकर आणि वनसंरक्षक व संचालक अनिता पाटील, उप संचालक (उत्तर) प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होईल, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.