

विरार : महाराष्ट्रात गुटखा तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर विक्री, साठेबाजी आणि तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून गुटखा बंदी प्रभावी ठरत नसल्याचे लक्षात आल्यानंतर, आता या संपूर्ण बेकायदेशीर साखळीवर घाव घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गुटखा माफियांवर थेट ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ अर्थात ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे.
राज्यात सन 2012 पासून गुटखाबंदी लागू असली, तरी प्रत्यक्षात पानटपऱ्या, किराणा दुकाने, तसेच गुप्त साठवणूक केंद्रांमधून आजही गुटखा, सुगंधित सुपारी आणि इतर प्रतिबंधित पदार्थांची सर्रास विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. या बेकायदेशीर व्यवसायामागे संघटित टोळ्या सक्रिय असून, वाहतूक, साठवणूक आणि विक्रीची स्वतंत्र साखळी उभी करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य कारवाईचा या टोळ्यांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुटखाबंदीकरिता स्वतंत्र आणि अधिक कडक कायदा लागू करण्याची तयारी सुरू केली आहे.
सध्या अस्तित्वात असलेली कायदेशीर प्रक्रिया वेळखाऊ आणि अपुरी ठरत असल्याने, नव्या तरतुदींमध्ये पोलिसांना अधिक अधिकार देण्यात येणार आहेत. या कायद्यानुसार गुटखा तस्करी, मोठ्या प्रमाणावर साठेबाजी, वारंवार गुन्हे करणारे आरोपी तसेच या व्यवसायाला आर्थिक किंवा इतर स्वरूपाचे संरक्षण देणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
विशेष बाब म्हणजे, जे आरोपी वारंवार गुटखाबंदीचा भंग करताना आढळून येतील, त्यांच्यावर थेट ‘मकोका’ कायदा लावण्यात येणार आहे. ‘मकोका’ अंतर्गत कारवाई झाल्यास आरोपींना सहज जामीन मिळणार नाही. या कायद्यानुसार किमान पाच वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद असून, किमान पाच लाख रुपयांपर्यंत दंडही ठोठावला जाऊ शकतो. तसेच, या गुन्ह्यांतून मिळवलेली मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार राज्य सरकारला प्राप्त होणार आहेत.
दरम्यान, शाळा आणि महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शहरांतील गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर साठवणूक करून रात्रीच्या वेळी लहान वाहनांमधून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत गुटखा पोहोचवण्याचे प्रकार वाढल्याने, आता या संपूर्ण पुरवठा व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही महिन्यांत गुटखाबंदी अंतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार असून, गुटखा विक्रीत सहभागी असलेल्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
गुटखा सेवनामुळे तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात
गुटखा सेवनामुळे तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात येत असून, कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ कायद्यापुरती मर्यादित नसून, जनआरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नागरिकांनी गुटख्याच्या बेकायदेशीर विक्रीबाबत माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. राज्य सरकारच्या या कठोर निर्णयामुळे गुटखा माफिया, साठेबाज आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या साखळ्यांमध्ये खळबळ उडाली असून, महाराष्ट्रात गुटखाबंदी प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.