

पालघर: पालघर जिल्ह्यातील सीएनजी इंधनावरील वाहनचालकांसाठी चिंतेची बातमी असून बोईसर येथील गुजरात गॅस कंपनीचे मुख्य सीएनजी गॅस फिलिंग स्टेशन दुरुस्तीच्या कामासाठी सलग तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे पालघर जिल्ह्यासह ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुजरात गॅस कंपनीकडून पालघर जिल्ह्यात सध्या सुमारे 20 सीएनजी फिलिंग स्टेशनद्वारे गॅस पुरवठा केला जातो. मात्र बोईसर येथील मुख्य स्टेशनच बंद राहणार असल्याने उद्यापासून पुढील तीन दिवस जिल्ह्यातील सीएनजीवर चालणाऱ्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होणार आहे.
विशेषतः रिक्षा, टॅक्सी, खासगी प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहनचालक आर्थिक अडचणीत असताना आता सीएनजी गॅसचा संभाव्य तुटवडा त्यांच्या अडचणीत आणखी भर घालणार आहे. अनेक प्रवासी वाहतूक करणारी वाहने सीएनजीवर अवलंबून असल्याने इंधन उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रवासभाड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, मालवाहतूक करणारी अनेक व्यावसायिक वाहनेही सीएनजीवरच चालत असल्यामुळे गॅस पुरवठा खंडित झाल्यास मालवाहतूक सेवाही विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
परिणामी उद्योग, व्यापार आणि दैनंदिन पुरवठा व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. बोईसर येथील मुख्य स्टेशनच्या दुरुस्तीमुळे निर्माण होणाऱ्या या परिस्थितीकडे वाहनचालक, वाहतूक व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान गुजरात गॅस कंपनीकडून पर्यायी व्यवस्था केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गुजरात गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार दुरुस्तीच्या कामामुळे सीएनजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होणार आहे, परंतु सीएनजी गॅस स्टेशन ला केला जाणारा गॅस पुरवठा पूर्णपणे बंद केला जाणार नाही.