Metro Slab Falls On School Bus: मेट्रोच्या कामात मृत्यूला निमंत्रण! स्कूल बसवर कोसळले प्लास्टर; विद्यार्थी थोडक्यात बचावले

गोल्डन नेस्ट स्थानकात थरार, टायर पंक्चर होऊन बस रस्त्यातच थांबली
Bhayandar Metro Accident
Bhayandar Metro AccidentPudhari
Published on
Updated on

भाईंदर: मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या नादात सुरक्षेचे नियम वाऱ्यावर सोडल्याचा संतापजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. काशिगाव ते भाईंदर मेट्रो मार्गावर गोल्डन नेस्ट मेट्रो स्थानकाच्या स्लॅबचे प्लास्टर सोमवारी दुपारी सुमारे १ वाजता अचानक कोसळून तेथून जाणाऱ्या मिनी स्कूल बसवर पडले.

प्लास्टरच्या तुकड्यांमुळे बसचा टायर पंक्चर झाला आणि बस रस्त्यातच थांबली. सुदैवाने बसमधील विद्यार्थी बचावले; अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

काशिगाव-भाईंदर मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्सकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र, वेगाच्या नादात कामाचा दर्जा आणि नागरिकांची सुरक्षा धोक्यात आणली जात असल्याचा आरोप होत आहे.

मेट्रोच्या कामादरम्यान यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. काही महिन्यांपूर्वी बांधकामाचा मलबा पादचाऱ्यांच्या अंगावर पडल्याने भाईंदर पोलिसांनी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी एमएमआरडीएने ठेकेदारावर दीड कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई केली होती.

Bhayandar Metro Accident
Tarapur Factory Blast: विराज प्रोफाइल कंपनीत भट्टीचा भीषण स्फोट

त्यानंतर सिल्वर पार्क परिसरात ठेकेदाराच्या कामगाराने ज्येष्ठ नागरिकाला क्रेनने धडक देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. पादचाऱ्यांना मारहाण केल्याची घटनाही समोर आली होती. काही दिवसांपूर्वी पावसात खड्डे बुजविताना आवश्यक सुरक्षा उपाय न केल्याने गरम डांबरावरून दुचाकी घसरून चालकाचा हात भाजला.

या घटनेनंतरही एमएमआरडीएने ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली होती. मात्र, कारवाईनंतरही सुरक्षेतील त्रुटी कायम असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. सोमवारी क्रेनच्या सहाय्याने काम सुरू असतानाही वाहतूक इतरत्र वळविण्यात आली नव्हती. त्यामुळे स्लॅबचे प्लास्टर कोसळून स्कूल बसचे नुकसान झाले.

प्लास्टरचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते. सुदैवाने त्यावरून घसरून अन्य कोणताही अपघात झाला नाही. भविष्यात एखाद्या निष्पाप नागरिकाचा किंवा विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही उपस्थित होत असून, एमएमआरडीए, महापालिका तसेच स्थानिक व वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.

Bhayandar Metro Accident
36000 Industries Closed: महाराष्ट्रातील ३६ हजार उद्योग बंद; श्वेतपत्रिका काढण्याची सिटूची उद्योगमंत्र्यांकडे मागणी

कंत्राटदारांना १२.५० कोटींचा दंड; एमएमआरडीएकडून गंभीर दखल

मिरा रोड : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो मार्गिका क्रमांक ९ च्या मेडतिया नगर स्थानक परिसरात सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार सोमवारी घडला. सकाळी ११.५० वाजता क्रेनच्या बास्केटचा धक्का लागल्याने पादचारी पुलाजवळ ठेवलेले ग्रॅनाइटचे दगड व धारदार तुकडे बॅरिकेडिंगबाहेर मुख्य रस्त्यावर पडले.

घटनेची गंभीर दखल घेत एमएमआरडीएने जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्सला १० कोटी, एन. ए. गजाननला १.५० कोटी आणि सिस्ट्रा-सीईजीला १ कोटी, असा एकूण १२.५० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. वाहनावर थेट दगड पडल्याचे वृत्त एमएमआरडीएने फेटाळले असून, घटनेवेळी वाहनात विद्यार्थी नसल्याचे स्पष्ट केले आहे.गरम डांबरामुळे कामगार जखमी होणे, दुचाकीस्वार भाजणे, जॅक कोसळणे आणि कामगाराचा मृत्यू अशा घटनांमध्ये दंड ठोठावण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news