ठाणे : महिलांवरील अत्याचाराच्या लागोपाठ समोर येणार्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात दाखल गुन्हेगारीचा आढावा घेतला तर ठाण्यात सरासरी दररोज दोन विनयभंग आणि दरदिवसाआड एक बलात्काराचा गुन्हा दाखल होत असल्याची बाब समोर आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत जानेवारी ते जुलै 2024 या सात महिन्याच्या कालावधीत बलात्काराचे 190 तर विनयभंगाचे तब्बल 332 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशाभरात महिलांवर होणार्या अन्याय अत्याचाराविरोधात जे जनआंदोलन उसळले त्यावरून महिलांवरील अन्याय कमी होईल अशी अशा होती. मात्र पोलिस दप्तरी नोंद झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची आकडेवारी बघितली तर ही अशा पूर्णत: फोल ठरते. राज्यात गेल्या तीन वर्षात महिलांवर होणार्या अन्याय-अत्याचाराच्या व छळवणूकीच्या घटनेत वर्षागणिक 12.24 टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिलांवर होणार्या गुन्ह्यात घट व्हावी म्हणून अनेक विधायक उपक्रम व मोहीम शासनाने राबवून देखील त्याचा फारसा परिणाम महिलांवर अन्याय करणार्या प्रवृत्तीवर जाणवत नसल्याचे चित्र या आकडेवारीमुळे जाणवते. ठाणे पोलीस आयुक्तालयात दररोज सरासरी दोन विनयभंगाचे तर दरदिवसाला एक बलात्काराचा गुन्हा दाखल होत असल्याची बाब समोर येते.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गेल्या सात महिन्यात 190 बलात्काराचे तर 332 विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात बलात्काराच्या गुन्ह्यातील 173 गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करून गुन्ह्याची उकल केली आहे. तर 17 गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार आहेत. तसेच विनयभंगाच्या एकूण गुन्ह्यांपैकी 306 गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीतल्या एका अल्पवयीन युवतीवर सामूहिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला होता.
ठाण्यात परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी दिवसेंदिवस फोफावत असतांना महिलांच्या बाबतीत होणार्या गुन्ह्यात देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही मनोविकृत समाज घटकाच्या अत्याचाराला आज देखील स्त्री बळी पडत असल्याचे विदारक चित्र पोलिसांच्या दप्तरी नोंद होत असलेल्या स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे समोर येत आहे. गेल्या काही वर्षात राज्यात स्त्रियांच्या छळवनुकीच्या घटनेत मोठी वाढ झाल्याची बाब दस्तुरखुद पोलिसांच्याच गुन्हे अन्वेषण विभागाच्या रिपोर्टमध्ये ठळकपणे अधोरेखित करण्यात आली आहे.