

मनोज ताठे
खडवली: भातसाई नदीपात्रात वाढत चाललेल्या बेकायदा बांधकामांमुळे संभाव्य जीवितहानीचा धोका निर्माण झाल्याने कल्याण तालुका पोलिसांनी अखेर कठोर भूमिका घेतली आहे.
नदीपात्रातील अतिक्रमणे, अनधिकृत हॉटेल्स आणि झोपड्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले असून, भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
भातसाई नदी परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढल्याची बाब समोर आली आहे. नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण करणारी बांधकामे, नदीकाठावरील झोपड्या आणि अनधिकृत व्यावसायिक आस्थापना यामुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात आला आहे. त्यातच उन्हाळा आणि पावसाळ्यात नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असल्याने दुर्घटनांचा धोका अधिक वाढला आहे.
कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यांनी खडवली ग्रामपंचायतीला पाठविलेल्या पत्रात नदीपात्रातील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विशेष म्हणजे यापूर्वीही या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी कारवाई झालेली दिसून न आल्याने पोलिसांना पुन्हा हस्तक्षेप करावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, भातसाई नदीकाठावर वर्षानुवर्षे अतिक्रमणांचे जाळे वाढत आहे. यामुळे नदीचे पात्र संकुचित होत असून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.
तसेच मुसळधार पावसाच्या काळात पूरस्थिती निर्माण झाल्यास या बेकायदा बांधकामांमुळे मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुर्घटना घडण्याची वाट पाहू नका!
भातसाई नदीपात्रातील वाढती अतिक्रमणे आणि धोकादायक उपक्रमांमुळे भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीवितहानी होण्यापूर्वीच कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.