डोंबिवली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या अंमलबजावणीकरिता प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. एकीकडे निवडणुकीच्या प्रक्रियेत निवडणुक आयोग आणि प्रचार प्रक्रियेत राजकीय पक्षांची यंत्रणा व्यस्त असतानाच विधानसभा निवडणूक भरारी पथकाने शनिवारी संध्याकाळी लक्षवेधी कारवाई केली. कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात या पथकाने १ लाख १० हजार रूपये किंमतीचा विदेशी दारूचा साठा कारमधून जप्त केला.
सदर दारू खरेदी-विक्रीच्या पावत्यांसह सविस्तर माहिती कारमधील इसम देऊ शकला नाही. त्यामुळे भरारी पथकाने कारसह सदर इसमाला अधिक चौकशीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी संध्याकाळी कल्याण पूर्वेतील चक्कीनाक्यावर नाकाबंदी केली होती. या पथकाकडून संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू होती. इतक्यात या चौकातून एक कार भरधाव वेगाने जाताना दिसली. पथकाने कार अडवून तपासणी केली असता त्याच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. कारमधील इसमाकडे विदेशी दारू खरेदी आणि विक्रीच्या पावत्या तपासणीसाठी मागितल्या. मात्र त्याबद्दलची माहिती कार चालकासह त्याचा साथीदार देऊ शकला नाही.
निवडणूकीच्या दरम्यान दारूचा गैरउपयोग होण्याची शक्यता असल्याने पथकाने ही माहिती तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आर. डी. आव्हाड यांना दिली. हवालदार वाय. के. गायकवाड, पंच सुनील कशिवले आणि रोहिदास डोक यांच्या उपस्थितीत या विदेशी दारूसह कारचा पंचनामा करण्यात आला. निवडणूक भरारी पथकाने अधिक चौकशीसाठी ही कार दारूच्या साठ्यासह उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. सदर विदेशी दारूचा कारमधून वाहून नेण्याचे काम पश्चिम डोंबिवलीतील देवीचा पाड्यात राहणारे संतोष किट्टना शेट्टी (४०) करत असल्याचे निवडणूक आणि दारूबंदी खात्याच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.