

Thane Dombivli Barvi River Flood Alert
बदलापूर : बारवी धरण पाणलोट क्षेत्रात असलेल्या चांदप, पादीरपाडा, पिंपळोली, आसनोली, राहटोली, चोण, कारंद आणि सागाव या गावांना सतर्कतेचा इशारा तालुका बारावी धरणाचे उप अभियंता कार्यालयाने दिला आहे.
बारवी धरणात सध्या 71.70 मीटर इतकी पाणी पातळी असून 72.60 मीटर हीओव्हरफ्लो मर्यादा आहे. सध्या 92 टक्के पाणीसाठा झाला आहे. आत्तापर्यंत बारवी परिसरात 2160 मिमी पाउस झाल्याची नोंद आहे. धरणात 309.94 दशलक्ष घनमीटरइतका पाणीसाठा झाला आहे. 72.20 मीटर वर पाण्याची पातळी गेल्यानंतर स्वयंचलित दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग होणार आहे.
गेल्या वर्षी हे धरण भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे उघडले जात असल्याने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत होता. या साऱ्याचा विचार करून यंदा बारवी धरण प्रशासन आणि जिल्हा आपत्ती प्रशासनाने धरण भरण्याच्या आधीपासूनच सतर्कता दाखवायला सुरुवात केली आहे.
ठाण्यासह एकूण सहा महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागत असल्याने जवळच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. बारावी धरण विभागाच्या कार्यकारी अभियंता पाणलोट क्षेत्रात असलेल्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक यांच्या बैठका घेऊन त्यांना व्यवस्थित माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
धरणातून पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते नदी प्रवाहात येऊन कल्याणच्या खाडीला मिळते. धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात कोणीही उतरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या एक ते दोन दिवसांत असाच पाऊस सुरू राहिल्यास बारावी धरण पूर्णपणे भरून ओव्हर फ्लो होण्याची शक्यता एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.