

बजरंग वाळुंज
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे जिल्हावासियांची अर्थात ४० लाखांहून अधिक नागरिकांच्या तहान भागवणाऱ्या बारवी धरणाबत दिलासादायक चित्र समोर आले आहे. रविवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या आकडेवारीनुसार बारवी धरणाची पातळी ७०.८१ मीटरवर पोहोचली आहे. धरणाची कमाल क्षमता ७२.६० मीटर आहे. सध्या धरणात २८६.५६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून एकूण क्षमतेच्या ८४.५७ टक्के पाणी भरले आहे.
गेल्या २४ तासात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४.८० मि.मी. पावसाची नोंद झाली. या मोसमात आतापर्यंत एकूण १९८८.४० मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा आकडेवारी वेगळी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाहिल्यास चित्र वेगळे दिसते.
२ ऑगस्ट २०२५ रोजी याच दिवशी बारवीची पातळी ७२.०६ मीटर होती. त्यावेळी ३२०.०५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता आणि धरण ९४.४५ टक्के भरले होते. तसेच गेल्या वर्षी या तारखेपर्यंत १९५३.०० मि.मी. पाऊस झाला होता.
म्हणजेच यंदा गेल्या वर्षीपेक्षा ३५.४० मि.मी. अधिक पाऊस होऊनही धरणातील पातळी १.२५ मीटरने आणि साठा तब्बल १० टक्क्यांनी कमी आहे. सततच्या पावसामुळे आवक सुरू असली तरी बाष्पीभवन, गळती आणि वापरामुळे अपेक्षित साठा वाढत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
धरण ८५ टक्क्यांच्या उंबरठ्यावर असल्याने एमआयडीसी प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला आहे. सध्या तरी उन्हाळ्यापर्यंत पाणी टंचाईचा प्रश्न नाही. मात्र पाऊस चांगला होऊनही साठा कमी असल्याने प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास बारवी लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिलेल्या आकडेवारीकडे नागरिकांनी लक्ष ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात एमआयडीसीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता धरणाच्या कोणत्याही स्वयंचलित पाण्याची गळती होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे धरणात येणारे प्रत्येक थेंब पाणी साठवले जाणार आहे. पावसाळ्यात पाणी वाचविण्यासाठी झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
१०० टक्के गळती थांबविण्यात डायव्हर्सच्या प्रयत्नांना यश
बारवी धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यांमधून गेल्या काही दिवसांपासून होणारी गळती बुधवारी अखेर पूर्णपणे थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे. पाण्याखालील तज्ज्ञ डायव्हर्सच्या मदतीने ही १०० टक्के गळती अटकाव करण्यात आली आहे.
धरणातील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासन प्रयत्नशील होते. धरणाची पाणीपातळी वाढत असताना स्वयंचलित दरवाज्यांमधून पाण्याची गळती होत असल्याने साठ्यावर परिणाम होत होता. अखेर बुधवारी गळती पूर्ण पणे बंद झाली आहे. बुधवारी पाण्याखालील डायव्हर्स उतरवून गळतीचे नेमके ठिकाण शोधून त्यावर तातडीने दुरूस्ती करण्यात आली.