

बदलापूर: बदलापूर शहराला आता टाटा पॉवरचा वीजपुरवठा होणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत कुळगांव बदलापूर नगरपरिषद येथील कात्रप येथील क्रीडा संकुलाच्या जागेवर चार एकर जागा ही टाटा पॉवर वीज कंपनीला देण्यास आरक्षण बदलास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
त्यामुळे बदलापूरकरांची वाढलेली विजेची मागणी टाटा पॉवर कंपनी पूर्ण करणार असून यामुळे बदलापूरकरांना या पुढील काळात विज संकटाचा कोणताही सामना करावा लागणार नाही. राज्य मंत्रिमंडळाान घेतलेल्या या निर्णयाबद्दल आमदार किसन कथोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बदलापूरकरांच्यावतीने आभार व्यक्त केले आहेत.
टाटा पॉवर च्या स्विचिंग स्टेशन साठी कुळगांव-बदलापूर नगर परिषदेची कात्रप येथील मोहपाड्या जवळील चार एकर जागा बदलापूर नगरपालिका हस्तांतरित करणार मिळावी यासाठी आमदार किसन कचोरे हे गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील होते.
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण विषयाला मान्यता मिळाल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडून ही जागा टाटा पॉवर कंपनीला हस्तांतरित करून या जागेवर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.
कुळगांव-बदलापूर शहरासाठी हा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प असणार ठरणार असून यामुळे बदलापूर शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचे प्रमाण शून्यावर येणार आहे. तसेच बदलापूर शहराची वाढती विजेची मागणी लक्षात घेता 400 मेगावॅट पर्यंतची वीज बदलापूर शहराला पुरवण्यात येईल इतके मोठे स्विचिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.
बदलापूर शहराला सध्या महावितरण कडून वीज पुरवठा करण्यात येतो. मात्र विजेची मागणी बदलापूर शहरात प्रचंड आहे, विशेष करून उन्हाळ्यात विजेची मागणी ही महावितरण कडे असलेल्या एकूण इन्फ्रास्ट्रक्चरच्या दीडपटीहून अधिक वाढते. त्यामुळे अनेक वेळा रात्री तासंतास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढलं आहे. तसेच एका स्विचिंग स्टेशन वरून वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुसऱ्या स्विचिंग स्टेशनवर लोड वाढल्यास दुसऱ्या भागातील नागरिकांनाही त्याचा फटका बसत होता.
बदलापुरातील विजेच्या समस्या बंद होणार
या साऱ्या समस्या टाटा पॉवर कंपनीच्या वीज पुरवठ्यानंतर सुरळीत होणार असल्याचा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. टाटा पॉवर कंपनी ही थेट ग्राहकांना वीज देणार नसली तरी महावितरणला बदलापुरात महापारेषण ऐवजी टाटा पॉवर कंपनीकडून वीज पुरवठा होणार असल्याने हा वीज पुरवठा अखंडित आणि मुबलक प्रमाणात होणार आहे. टाटा पॉवर कडून वीज मिळाल्यामुळे बदलापुरातील नागरिकांसाठी विजेच्या समस्या मुळे होणारे त्रास बंद होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला.